धुळे-नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धुळ्यात रविवारी भाजपच्या खासदार हीना गावित जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार गावित यांच्या वाहनावर हल्ला केला होता. हल्ला झाला त्यावेळी गावीत या स्वतः गाडीत होत्या. त्यानंतर हे प्रकरण थेट लोकसभेत गेले आणि स्वत: हिना गावित यांनी या प्रकरणात हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसभेत बोलताना केली होती. तसेच एखाद्या महिलेला सुरक्षा देता येत नसेल तर तेथील पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करत संध्याकाळीच धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती.