पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यात यंदा 31 डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने तीन लाख 67 हजार परवाने वाटण्यात आले आहे. तर 25 ते 29 डिसेंबरच्या कालावधीत सहा मोठ्या कारवाई केल्या असून यामध्ये 10 लाख 50 हजार रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे पोलीस उप अधिक्षक फुलपगारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात एक दिवसीय मद्य परवान्याची मागणी वाढते. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी तीन लाख परवान्यांचे वाटप करण्यात आले होते. तर यंदा ही संख्या 67 हजारांनी वाढली असून यंदा तीन लाख 67 हजार परवाने वाटण्यात आले आहेत.
पास मागणीत वाढ
फुलपगारे म्हणाले, हा परवाना केवळ पाच रुपयांचा असतो. ज्यामध्ये तुम्हाला एक दिवस मद्य प्राशन करण्याची परवानगी मिळते. तर वर्षभरासाठी 100 रुपये तर हजार रुपयात आजीवन मद्य प्राशन करण्याचा परवाना मिळतो. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय परवाना मागणीमध्ये वाढ होते. त्यानुसार आम्ही यंदा तीन लाख 67 हजार परवाने जिल्हा भरात वाटले आहे.
चार दिवसात दहा लाखांची दारु जप्त
या पार्श्वभूमीवर आणखी अवैध दारुवर चाप बसवण्यासाठी कारवाई देखील सुरु आहे. यामध्ये आम्ही 25 ते 28 डिसेंबर या कालावधीत सहा कारवाया केल्या असून यामध्ये एक चार चाकी, दोन दुचाकी व दहा लाख 50 हजार रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे. तर आठ आरोपी अटक केले आहेत. तर फुगेवाडी व दापोडी येथे कारवाई केली असून यामध्ये तीन लाख 57 हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे, असेही फुलपगारे यांनी सांगितले.