बैलगाडा शर्यतीबाबत निवडणुकीच्या तोंडावर पत्रकबाजी करण्यात खा. आढळराव पटाईत : नगरसेवक राहुल जाधव
भोसरी : बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या 13 वर्षांपासून खासदार असणार्या शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात पटाईत असलेले आढळराव यांनी पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत ते गंभीर नसून, केवळ भावनिक मुद्दा करुन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा, हल्लाबोल भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे. यावेळी जाधव यांनी खा. आढळराव यांना रंग बदलणार्या सरड्याची उपमादेखील दिली आहे.
बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यांवरच खा. आढळरावांनी निवडणुका जिंकल्या!
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी करावयाच्या कायद्यातील बदलाला केंद्र सरकारने लेखी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन नगरसेवक राहुल जाधव यांनी खासदार आढळराव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी नमूद केले, की गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे गेल्या 13 वर्षांपासून खासदार आहेत. प्रत्येकवेळी निवडणूक आली की आढळराव बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हाती घेतात. सरकारवर आरोप करतात आणि आपण किती बैलगाडा मालकांच्या बाजूने आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. शेतकर्यांमध्ये जातात मी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत असल्याचे खोटे सांगतात आणि नागरिकांना भुलवतात. 2009 आणि 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरूनच जिंकली. मात्र, शर्यतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे बैलगाडा मालक-चालक संघटना त्यांच्याविरोधात गेल्या आहेत. केवळ निवडणूकजवळ आली की त्यांना बैलगाडा शर्यतीची आठवण होते, असेही जाधव म्हणाले.
आ. लांडगे यांच्यामुळेच शर्यतबंदी उठविण्याचा कायदा
आमदार महेश लांडगे यांनी तीन वर्षात राज्य सरकारच्या पाठीमागे लागून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार करुन घेतला. विशेष म्हणजे, भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकीलांची नेमणूक केली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार मोठे प्रयत्न करत आहे. सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला की शिवसेना सत्तेत आहे. आमचेदेखील तो कायदा करण्यात योगदान आहे, असे सांगून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार शिवाजीराव आढळराव करतात. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली की हेच खासदार सरड्याला लाजवेल अशा प्रकारे रंग बदलतात आणि सरकारवर टीका करतात. सरकारने कायदा सक्षम केला नसल्याचे सांगतात. कायदा करताना शिवसेनेचे योगदान असे सांगतात. मग, कायदा करताना शिवसेनेचे मंत्री, आमदार काय करत होते? असा सवालही नगरसेवक जाधव यांनी उपस्थित केला.
खा. आढळरावांच्या आरोपांवर मात्र भाजपनेत्यांची चुप्पी
दरम्यान, समाविष्ट गावांतील आरक्षणे विकास व रस्तेविकासाच्या कामांत खा. आढळराव व खा. श्रीरंग बारणे यांची महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर सुमारे 90 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपचे कुणीही पुढे आले नाही. भोसरीचे आ. महेश लांडगे यांच्या समर्थकांनी खा. आढळरावांवर या मुद्द्यावर टीका केली असली तरी, या आरोपांना स्वतः आ. लांडगे यांनी उत्तर देण्याचे टाळल्याचे दिसून आले. या भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनी चुप्पी का साधली? असा प्रश्नही शहरवासीयांत निर्माण झालेला आहे.