खा. काकडेंना भाजप कळला; गुन्हे दाखल होताच भाषा बदलली!

0

पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी सुरु असलेल्या शीतयुद्धातून अखेर खासदार संजय काकडे यांनी अखेर सपशेल माघार घेतली आहे. भूखंड घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन आदेशावरून वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर खा. काकडे यांची भाषाच बदलली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आपले काहीही शीतयुद्ध नाही. त्यांनी पुण्यात व जिल्ह्यात लक्ष घालावे. आपण मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राज्यात लक्ष घालणार आहोत. जेथे भाजपची ताकद कमी आहे, अशा 40 विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आपणास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आपण या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करू, अशी भूमिका खा. काकडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. त्यामुळे महापालिकेतील काकडेसमर्थक नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. महापालिकेत सद्या बापटसमर्थक व काकडेसमर्थकांतून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती आहे. आता खा. काकडेंनी माघार घेतल्याने हे समर्थक एकटे पडले आहेत.

राज्यभर भाजप वाढविणार!
भूखंड घोटाळाप्रकरणी खा. संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. तथापि, खा. काकडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही खा. काकडे यांनी केला होता. दरम्यान, गुन्हे दाखल होताच खा. काकडे यांची भाषा मात्र बदलली आहे. शहरातील राजकारणात पालकमंत्री गिरीश बापट व आपल्यात काहीही शीतयुद्ध चालू नाही, असे काकडे म्हणाले. आपण राज्यभर भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करत असून, गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी तपासलेली आहेत. आता पोलिस तपास करतील, तथापि, याप्रकरणात आपण काहीही चुकीचे काम केलेले नाही, असे खा. काकडे यांनी स्पष्ट केले. पुणे शहर किंवा जिल्ह्यातील राजकारणापुरते आपणास मर्यादित रहायचे नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण राज्यस्तरावर काम करणार आहोत. तशी पक्षाची जबाबदारीही आपण स्वीकारलेली आहे, असेही खा. काकडे म्हणाले.

स्थानिक व केंद्रीय राजकारणात रस नाही!
ज्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात भाजप मजबूत नाही. तेथे सुमारे 40 विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खांद्यावर टाकलेली आहे, ती जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू, असे सांगून खा. काकडे म्हणाले, शहर व जिल्ह्यातील राजकारण हे पालकमंत्र्यांनीच पहावे, त्यात आपण कधीच हस्तक्षेप करत नव्हतो. पक्षाने जी जबाबदारी सोपावली ती आपण कष्टपूर्वक पूर्ण करू. पक्षाचा राज्यसभेचा खासदार असल्याने राज्यभरात आपण काम करण्यास सक्षम आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जेथे पक्ष कमकुवत आहे, तेथे तो मजबूत करण्यासाठी आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. त्यानुसार, आपण आपले काम चोखपणे करत आहोत. केंद्रीय राजकारणात किंवा फारच स्थानिक पातळीवरील राजकारणात लक्ष घालण्याचे काहीच प्रयोजन नाही, असेही खा. काकडे यांनी स्पष्ट केले. खा. काकडे यांच्या या भूमिकेने पुणे शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे राजकारण संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.