शिवसेना पाच तर भाजप 28 जागा जिंकेल
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचे नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ पाच तर भाजपचे 28 खासदार निवडून येतील, असे आकडे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर मांडले आहेत. खा. काकडे यांनी गुजराबाबत केलेल्या भाकितानंतर ते तोंडघशी पडले होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची कानउघाडणीही केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेबाबत आपले भाकित वर्तविले आहे.
खा. काकडे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे शिवसेनेची वाढ होणार नसून, नुकसानच होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपच राहील. मोदींच्या करिष्म्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपचे 28 आणि शिवसेनेचे पाच खासदार निवडून येतील. शिवसेना विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचे 165 आमदार निवडून येतील, असेही खा. काकडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केले.