खा. काकडेंशी पंगा भोवला, पुणे शहराची सूत्रे मुख्यमंत्र्यांच्या हाती!

0

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्यातील सुप्तसंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. चोवीस तांस पाणी पुरवठा योजनेची निविदा रद्द करण्यासाठी खा. काकडे यांनी दबाव निर्माण केल्यानंतर या निविदा पुणे महापालिकेला रद्द कराव्या लागल्या होत्या. त्या पाठोपाठ आता ना. बापट यांना पक्ष पातळीवर आणि इतर संस्थात्मक ठिकाणीही अडचणीत आणण्याचे काम खा. काकडे समर्थकांकडून सुरु आहे. 2015 मध्ये पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली होती. ती रद्द करत मुख्यमंत्र्यांनी हे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले आहे. तसेच, पुणे मेट्रोसह इतर विकासकामांवरही स्वतःच लक्ष घालणे सुरु केले आहे. भाजपच्या नियुक्त्यांतही मुख्यमंत्रीच निर्णय घेत असल्याने खा. काकडे यांनी पालकमंत्र्यांवर केलेली ही कुरघोडी मानली जात आहे.

विकास योजनांचे निर्णय मुख्यमंत्र्यांमार्फत!
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने पुण्यात अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला आहे. परंतु, शहर भाजपवर वर्चस्व कुणाचे? या वादातून खा. संजय काकडे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात सद्या जोरदार शीतयुद्ध सुरु आहे. बापटसमर्थक आणि काकडेसमर्थक असे दोन गट शहर भाजपात निर्माण झाले असून, महापालिकेत सत्ता असूनही काकडेसमर्थकांना डावलण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे खा. काकडे हेदेखील मुख्यमंत्र्यांमार्फत शहरात आपली निर्णयप्रक्रिया राबवित आहेत. पुण्यात सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांत तातडीने निर्णय घेण्यासाठी तसेच हे प्रकल्प वेळेपूर्वी मार्गी लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे बापटसमर्थकांची मोठी गोची झाली आहे. गणेश खिंड येथील कृषी महाविद्यालयाची जागा संपादन करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेताच घेतला, तसेच पुणे विकास योजनेच्या अनेक निर्णयांतही मुख्यमंत्री स्थानिक नेत्यांना फारसे विचारात घेत नसल्याचे दिसून येत आहे.

ना. बापट-खा. काकडेसमर्थकांत सुप्तसंघर्ष
पुणे मेट्रो, एफसीआयची जागा संपादीत करणे, चोवीस तास पाणी योजनेचे टेंडर रद्द करणे यासारख्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री थेट निर्णय घेत असल्याने पालकमंत्री गिरीश बापट समर्थकांची मोठी गोची झाली असल्याची माहिती भाजपसूत्राने दिली. केवळ विकास योजनांबाबतच नाही तर शहर पातळीवरील राजकीय निर्णयांतही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. पुणे महापालिकेत गणेश बिडकर यांच्या नियुक्तीवेळीही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता. स्थानिक पातळीवर पालकमंत्री गिरीश बापट यांचे समर्थक खा. काकडे समर्थकांना अव्हेरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यक्रमांनाही खा. काकडेंना डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. तर खा. काकडे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात कमालीचे सख्य असून, त्या संबंधांचा वापर करून खा. काकडे हे पालकमंत्र्यांच्या गटाला झटके देत असल्याची राजकीय चर्चा शहरात होत आहे.