खा. काकडेकन्येचा शाही विवाह; संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन!

0

पुणे : राज्यात कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा झालेला उद्रेक, लग्नासाठी पैसे नसल्याने गोरगरीब शेतकर्‍यांच्या मुली करत असलेल्या आत्महत्या, सर्वदूर दुष्काळामुळे हतबल झालेला शेतकरी अन् कर्जमाफी देण्यावरून सुरु असलेला सत्ताधारी भाजप सरकारचा चालढकलपणा यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच, भाजपचे खासदार तथा उद्योगपती संजय काकडे यांनी त्यांच्या कन्येचा म्हाळुंगेतील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अगदी शाही विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्याचे वैभव पाहून अनेकांचे डोळे दिपले. या सोहळ्याने राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख व खा. संजय काकडे हे व्याही झाले आहेत. खा. काकडे यांची कन्या कोमल व ना. देशमुखांचे चिरंजीव रोहण यांच्या या शाही विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ व राज्यातील दिग्गजांची हजेरी लाभली होती. शाही विवाहावरून टीका सुरु होताच, राज्यातील गरजू मुलांना शिक्षणासाठी एक कोटींची मदत देणार असल्याची घोषणा खा. काकडे यांनी करून विरोधाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. या विवाहानिमित्त अब्जावधी रुपयांची उधळपट्टी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा उपदेश धाब्यावर बसविला!
रविवारी पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, भाजप तसेच इतर राजकीय पक्षांचे नेते, उद्योगक्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जुन हजेरी लावली. दुष्काळ आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सातत्याने भेडसावत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांनी त्यांच्या मुलाचाही शाही विवाह पार पाडला होता. त्यावरूनही जोरदार टीका झाली होती. खा. दानवेंचाच कित्ता खा. काकडे यांनी गिरवला असून, विवाह सोहळ्याच्या आयोजनासह भव्यता, पंचपक्वान्न आणि इतर उधळपट्टीवर अब्जावधींचा खर्च केल्याचे दिसून आले. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात या शाही विवाहाची अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. गेल्या महिन्यात चिंचवड येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना पक्षात व्हीआयपी संस्कृती आणू नका. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे वागू नका, बडेजाव मिरवणे टाळा. सामान्यांशी नाळ जुळवून ठेवा, असे बजावले होते. या सोहळ्याकडे पाहिले असता, त्याचा कोणताही परिणाम पक्षाच्या नेत्यांवर झाला नसल्याचे दिसून आले.

व्हीव्हीआयपींची उपस्थिती..
या सोहळ्यास उपस्थितांसाठी शाही मेजवानीचा बेत होता. या लग्नासाठी खासदार संजय काकडे यांनी अक्षरश: कोट्यवधी रूपयांचा चुराडा केल्याचे दिसून आले. रविवारी दिवसभर या शाही विवाहाची चर्चा पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात रंगली होती. या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, भाजप व अन्य पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप नेत्यांनी चालवलेले संपत्तीचे हे ओंगळवाणे प्रदर्शन असंवेदनशीलतेचे दर्शक असल्याचे स्पष्ट होत आहे.

बालेवाडी क्रीडा संकुल वापरले कसे?
नेत्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात पैसा, संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन होत असताना नियम आणि कायदाही धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे खा. काकडे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातून दिसून आले आहे. कारण, बालेवाडी क्रीडा संकुलाचा वापर यापुढे फक्त क्रीडाविषयक उपक्रमांसाठीच केला जाईल, ही वास्तू फक्त खेळांसाठीच वापरता येईल, विवाह सोहळे वगैरे कार्यक्रमांना यापुढे हे संकुल दिले जाणार नाही, अशी घोषणा सांस्कृतिक व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली होती. तरीही खा. काकडे यांनी आपले वजन वापरून या संकुलाचा वापर शाही विवाह सोहळ्यासाठी केला आहे.

उधळपट्टीवर समाजसेवेचा उतारा
मुलीच्या शाही विवाहासाठी भाजप खासदार संजय काकडे यांनी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी केली. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. लग्नाअभावी शेतकर्‍याच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटनाही ताजीच आहे. यासर्व परिस्थितीत आपल्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यावर टीका होणार, हे जाणल्याने खा. काकडे यांनी नामी शक्कल लढविली. सारवासारव करण्यासाठी त्यांनी राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत; यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असे जाहीर केले आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे तो धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही खा. काकडे यांनी केला आहे.