खा. काकडे ‘उपरे’!

0

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बावळट असल्याची भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केलेली टीका पदाधिकार्‍यांना चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे या पदाधिकार्‍यांनी रविवारी शहरात जोरदार फ्लेक्स लावून, ‘आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाही‘, असे पुणेरी टोमणे खा. काकडे यांना मारले. शिवाय, खा. काकडे हे उपरे आहेत, अशी टीकाही भाजपनेत्यांनी केली. त्यामुळे आतले-बाहरचे असा नवा वाद आता शहर भाजपात पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आक्षेप खा. काकडे यांनी नोंदविला होता. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रारही केली होती. परिणामी, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही वादग्रस्त निविदा प्रक्रियाच रद्द करावी लागली होती.

ना. बापट – खा. काकडे शीतयुद्ध जोरात!
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी खा. काकडे यांच्यावर उघडपणे टीका करताना सांगितले, की खा. काकडे हे बाहेरून पक्षात आलेले आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश केला होता. काकडे यांनी जी आक्षेपार्ह विधाने केली आहेत, त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकले आहे. आमचे काही निष्ठावंत आणि मूळचे भाजपचे असलेले नगरसेवक, आमदारही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे केवळ खा. काकडेच मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत, असे काही नाही, असा टोलाही मोहोळ यांनी लावला. समान पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनीच तसा निर्णय दिला. या प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांची काहीही भूमिका नाही. तरीही खा. काकडे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यात ओढले, अशी माहितीही भाजपनेत्यांनी दिली. महापौर मुक्ता टिळक यांनीही खा. काकडे यांच्या बावळट विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही हे विधानच बावळटपणाचे असल्याचे सांगितले. पुणे भाजपात सद्या पालकमंत्री गिरीश बापट आणि खा. काकडे यांच्यात जोरदार शीतयुद्ध भडकले असून, दोन गट निर्माण झाले आहेत.

फ्लेक्सबाजी वाढण्याची शक्यता
समान पाणी पुरवठा योजनेसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या दोन गटांतून दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. खासदार काकडे यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे जाहीर केले. तर महापौर, स्थायी समिती अध्यक्षांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याचे सांगितले. त्यामुळे शहर भाजपातील गटबाजीच दिसून आली होती. खासदार काकडे यांनी खोटे बोलणार्‍या पदाधिकार्‍यांनाही उघडे पाडले होते. परंतु, त्यानंतर आमचे महापालिकेतील आमचे पदाधिकार बावळट आहेत, हे विधान केल्यानंतर पुणे महापालिका किंवा शहरातील भाजपचा पदाधिकार्‍यांनी कोणतीही प्रतिकिया व्यक्त केली नव्हती. काकडेंनी बावळट म्हटल्याने नाराज झालेल्या भाजपमधील एका गटाने पुणेरी स्टाईलने उत्तर दिले आहे. रविवारी निलायम टॉकीज चौकातील सिग्नलच्या अगदी बाजूला ‘पुणेकर बंधू भगिनीनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाही‘ अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाजवळून जाणारे नागरिक काही क्षण थांबून तो पाहत आहेत. या फ्लेक्समुळे येणार्‍या काळात पुणे शहरात आणखी फ्लेक्सबाजी पाहण्यास मिळू शकते.