खा. काकडे तोंडघशी; मोदी ‘फर्स्टक्लास’, राहुलही ‘पास’!

0

गुजरात, हिमाचल प्रदेशात ‘कमळ’च फुलले!

पुणे/नवी दिल्ली : गुजरात व हिमाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना देत, ‘विकास जिंकला, गुजरात जिंकला’ असे ट्वीट करून दोन्ही राज्यांतील जनतेचे आभार व्यक्त केलेत. तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकासवादा’चा असल्याचे सांगून, मतदारांनी विकासवाद स्वीकारताना काँग्रेसचा जातीय व धर्मवाद नाकारला, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. दोन्हीही राज्यांत भाजपने निर्विवाद बहुमत सिद्ध केले असून, या विजयानंतर देशभर भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. गुजरातमधील निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत मोदी हे ‘फर्स्टक्लास’ पास झाले असले तरी, मोदी-शहा जोडगोळीस गृहराज्यात कडवी झुंज देणारे व काँग्रेसच्या प्रचाराची एकहाती कमान सांभाळणारे पक्षाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील ‘पास’ झाले आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाने काँग्रेसने गुजरातमध्ये तब्बल 80 जागा जिंकून, सरासरी दोन टक्के मतेही अधिक घेतली आहेत. तर गेल्या पाच वर्षात भाजपचे बहुमत प्रथमच दुहेरी आकड्यात आणण्यात खा. गांधी यांना यश आले. त्यांनी काँग्रेसचा पराभव स्वीकारला असून, गुजराती जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत.

या निकालाने आपण अजिबात निराश झालो नाहीत, असे सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोटमधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसानामधून विजयी झाले आहेत. प्रसिद्ध दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवानीही वडगाममधून विजयी झालेत. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसला पराभवाचे तोंड पहावे लागले असून, या राज्यात भाजपची सत्तावापसी झाली आहे. भाजपला 44 तर काँग्रेसला 21 जागा जिंकता आल्यात. तथापि, गड आला पण सिंह गेला अशी भाजपची अवस्था झाली. मुख्यमंत्रिपदाचे भाजप उमेदवार प्रेमकुमार धूमल यांचा पराभव झाला तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्षही पराभूत झाले. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे मात्र अर्की मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपला सत्ता स्थापण्याइतकेही बहुमत मिळणार नाही, असा दावा करणारे पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे निवडणूक निकालानंतर सपशेल तोंडघशी आपटले आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता, भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच यश मिळाले. आकडे चुकलेत, मोदीच हिरो, काकडे झिरो या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वी पुणे महापालिका निवडणुकीत खा. काकडे यांनी वर्तविलेले भाकित तंतोतंत खरे ठरले होते. त्यापार्श्वभूमीवर खा. काकडे यांचे गुजरातबाबतचेही भाकित खरे ठरणार की काय, अशी चर्चा सुरु होती. आपल्या माणसांनी गुजरातमध्ये जावून सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप तेथे हरणार असल्याचा स्पष्ट दावा खा. काकडे यांनी केला होता. या निकालाने त्यांच्या दाव्यासह ते स्वतः चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

काय म्हणाले होते खा. काकडे…!
खा. संजय काकडे म्हणाले होते, की गुजरातमध्ये भाजपकडे 22 वर्षांपासून सत्ता आहे, त्यामुळे त्यांना अ‍ॅण्टीएन्कबन्सीचा फटका बसेल. भाजपला या निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत घेऊनही सत्ता स्थापण्यासाठी संधी मिळणार नाही. म्हणजेच, 92 पेक्षा कमी जागा भाजपला मिळतील. आपण आपली माणसे गुजरातमध्ये पाठवून केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे, असेही खा. काकडे यांनी सांगितले होते. तर आता गुजरात निकाल हाती आल्यानंतर त्यांनी सांगितले, की भाजपला आज जे यश गुजरातमध्ये मिळाले ते केवळ पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यामुळे मिळाले आहे. मी काही चुकीचे बोललो नाही, किंवा जे बोललो त्यापासून मागेही हटत नाही. मात्र, आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मी भाष्य केले होते. आजचा निकाल त्याच्याशी बराच मिळता जुळता आहे. भाजपला सत्ता स्थापण्याइतपत बहुमत मिळाले ते केवळ मोदी यांच्यामुळेच, मोदी यांचे नेतृत्व आता सर्वमान्य झाले असून, 2019ची लोकसभा निवडणूकही ते आरामात जिंकतील, असेही खा. काकडे यांनी सांगितले. होय, मोदी हिरो, काकडे झिरो हे मान्य करतो, या शब्दांत त्यांनी आपल्या चुकलेल्या अंदाजाचीही कबुलीही दिली.

भाजपचा ‘काँग्रेसयुक्त’ विजय!
गुजरात निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी जवळपास एका टक्क्याने वाढली आहे. परंतु, त्यांच्या जागा घटल्या आहेत. तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सरासरी दोन टक्क्यांनी वाढली असून, त्यांच्या जागाही वाढल्या आहेत. काँग्रेसला गतविधानसभा निवडणुकीत 61 जागा मिळाल्या होत्या. त्या वाढून यावेळेस 80 झाल्या आहेत. तर भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या त्या कमी होऊन आता 99 झाल्या आहेत. सलग पाच निवडणुकांत भाजपला तिहेरी आकड्यात बहुमत मिळाले होते. ते यंदा प्रथमच दुहेरी आकड्यांत मिळाले आहे.

देशातील 19 राज्यांत भाजप, गुजरातमध्ये सत्तेची हॅट्ट्रीक!
गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ताप्राप्त करून भाजपने हॅट्ट्रीक साधली आहे. तर हिमाचल प्रदेश पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात त्यांना यश आले आहे. या दोन राज्यांतील विजयामुळे भाजपला 29 पैकी 19 राज्यांत सत्ता मिळाली असून, अशाप्रकारचे सत्ताकेंद्र यापूर्वी कोणत्याही अन्य राजकीय पक्षाला प्राप्त झाले नव्हते. 24 वर्षांपूर्वी देशात प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 18 राज्यांत आपली सत्ता स्थापन करता आली होती. डिसेंबर 1993 मध्ये काँग्रेसही केंद्रात प्रमुख सत्ताधारी पक्ष होता तेव्हा या पक्षाची 15 राज्यांत सत्ता होती. तर एका राज्यात ते आघाडीच्या सत्तेत होते. तसेच, दोन राज्यांत त्यांनी डाव्या पक्षांना पाठिंबा देऊन सत्ता सांभाळली होती. आजरोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या नेतृत्वात भाजपने 19 राज्यांत सत्ता प्राप्त केली असून, या सर्व विजयाचे सर्वाधिक श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाला दिले जात आहे. मे 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपने काँग्रेसमुक्त भारत ही मोहीमच सुरु केली आहे. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपची केवळ गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि नागालॅण्ड या राज्यात सत्ता होती. या शिवाय, भाजपच्या सहकार्याने तेलगु देसम पक्षाने आंध्रप्रदेशात तर शिवसेनेच्या सहकार्याने भाजपने महाराष्ट्रातही सत्ता प्राप्त केली होती.

हिमाचलमध्ये भाजपचा सिंह गेला…
हिमाचल प्रदेशात भाजपने 44 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले असले तरी, काँग्रेसचे वीरभद्र विरुद्ध प्रेमकुमार धूमल अशी लढत झालेल्या या निवडणुकीत भाजपने आपला सिंह गमावला आहे. तर अर्की मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि शिमला मतदारसंघातून त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह हे दोघेही बापलेक जिंकून आलेत. काँग्रेसचे या राज्यातील सत्ता गमावित 21 जागा जिंकल्यात. तर भाजपला 48.70 व काँग्रेसला 41.90 टक्के इतके मतदान झाले. राज्यातील 68 जागांसाठी 9 नोव्हेंबररोजी मतदान घेण्यात आले होते. यंदा प्रथमच 74.61 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. तर 2003 मध्ये सर्वाधिक 72.61 टक्के इतके मतदान झाले होते.

पक्ष मुख्यालयात मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव!
दोन राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी नवी दिल्लीतील पक्षाचे मुख्यालय गाठत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांचीही उपस्थिती होती. दोन्ही राज्यांतील जनतेचे आभार मानत ते म्हणाले, की जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपला निवडणुकांत पराभूत करण्याची भाषा बोलत होते. गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजय हेच दर्शवितो की मतदारांनी आता विकासाचाच मार्ग निवडला आहे. आमचा बदला घेण्याची तयारी होत असताना या राज्यांतील विजयाने काँग्रेसच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे, अशी टीकाही मोदींनी केली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कुशल रणनीतीमुळेच या दोन राज्यांतील विजय पक्षाला लाभला आहे. काँग्रेसने मान्य करावे किंवा करू नये, परंतु त्यांना सांगू इच्छितो की, भारताला जर पुढे नेण्याचे काम करायचे असेल तर विकासाशिवाय अन्य काहीही उपाय होऊच शकत नाही. विकासाच्या प्रक्रियेला खीळ ठोकण्याचे काम करू नका, असाच जनतेने त्यांना निवडणुकीतून संदेश दिला आहे, असेही मोदींनी ठणकावले.

गुजरातमध्ये झालेला भाजपचा विजय हा ईव्हीएममधील घोटाळ्याचा विजय आहे. माणसाच्या शरीरात जर डॉक्टर बदल करु शकतात, तर ईव्हीएम मशीनमध्ये का होऊ शकत नाही.
– हार्दिक पटेल, पाटीदार नेता

काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये विजय मिळवण्यासाठी अत्यंत खालच्या थराचा ओछा प्रचार केला. त्यांनी जातीयवादाच्या आधारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुजरातच्या जनतेने जातीयवादाला साथ न देता विकासवादाला साथ दिली आणि म्हणूनच भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे.
– अमित शहा, अध्यक्ष भाजप

विकासाचा मार्ग निवडल्याबद्दल गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेला नमन. विकासाच्या मार्गानेच भारताचा विकास शक्य आहे. जगात मोठे व्हायचे असेल तर भारतालाही विकासाचाच मार्ग निवडावा लागेल. नोटबंदीमुळे भाजप संपेल असे म्हटले जात होते. गुजरातमध्येही अशा अफवा होत्या. त्यावर जनतेने विश्वास ठेवला नाही.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गुजरात
पक्ष           जागा       मागील जागा
भाजप        99              115
काँग्रेस       80               61
इतर          03               06
एकूण       182             182

हिमाचल प्रदेश
भाजप       44               26
काँग्रेस       21               36
इतर          03              06
एकूण       68               68