खा. खैरेंशी मतभेद रामदास कदमांना भोवले!

0

औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून कदम यांची हकालपट्टी

मुंबई :- राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केलेले वक्तव्य भोवले आहे. त्यामुळे ना. कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि राज्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्यात बेबनाव होता. मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून ना. कदम आणि खा.खैरे यांच्यातील वाद वाढत गेला. त्यामुळे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ना.रामदास कदम यांच्याकडून औरंगाबाद जिल्हाचे पालकमंत्री पद काढून घेतले असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे. तर ना. कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर नियुक्ती केली असून या ठिकाणी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे.