खा. पटोलेंची ‘घरवापसी’

0

राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले गुरुवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसतर्फे ही माहिती देण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार अशी नाना पटोले यांची ओळख होती. याआधी दिल्ली येथे 4 जानेवारीरोजी एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकर्‍यंच्या भल्यासाठी कार्य करणार असे आश्वासन देवून सत्तेत आले होते. शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध योजना राबवितील असे त्यांनी म्हटले होते, मात्र तसे काही झाले नाही. असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. एकूण पक्षातील आंतरिक वादांमुळे त्यांनी पक्ष सोडले असल्याचे म्हटले जात आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने होते नाराज
खा. पटोले यांनी डिसेंबरमध्ये खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. भंडारा- गोंदियाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपला हादरा बसला होता. पटोले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आधीपासूनच होती. गुरुवारी दुपारी दिल्लीत पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. अशोक चव्हाण, संजय निरुपम आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले 2008 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. मात्र, विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही पटोलेंना पक्षात स्थान दिले. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पटोले खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांचा अपेक्षाभंग झाला होता. यामुळे पक्षावर नाराज होते.