शिरोळे यांची 2019च्या निवडणुकीची तयारी
पुणे : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुका उंबरठ्याजवळ येऊन ठेपल्या असल्याने खासदार अनिल शिरोळे यांनी स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेऊन 2019 लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा खासदारकी लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांवर नेहमी कुरघोडी करणारे भाजपमधील बापट, काकडे, शिरोळे हे तीन मात्तबर नेते एकत्र आले होते. या तिघांचे स्नेहमिलनाच्या निमित्ताने खरोखर मनोमिलन होणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
सर्वपक्षीय नेत्यांची स्नेहमिलनाला उपस्थिती
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी शुक्रवारी (दि.19) स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपसह इतर पक्षातील नेते मंडळींनी देखील उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमासाठी शिरोळेंनी खास मेहनत घेतली होती. प्रत्येक्ष लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. आणि विशेष करून हा कार्यक्रम फक्त भाजपपुरता मर्यादित राहू नये यासाठी शिरोळे यांनी खास विरोधी पक्षांतील नेत्यांना आमदारांना वैयक्तीकरित्या भेटून आमंत्रण दिले होते. त्यामुळे कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
…आणि सुरेश कलमाडीही आले
यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्य चकित केल. मात्र या स्नेहमिलनांत सर्वांच्या नजरा बापट आणि काकडे यांच्या येणाकडे लागल्या होत्या. काही दिवसापूर्वी शिरोळे यांनी काकडेची भेट घेऊन 2019 साठी मदत करण्याचे आवाहन केला होते. मात्र 2014 साली खासदारकीसाठी इच्छुक असणारे गिरीश बापट त्याचे तिकीट कापून शिरोळेंना देण्यात आले होते. खासदार शिरोळे यांच्या 2019 मिशनसाठी बापट मदतीला येणार का? या बाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र रात्री उशिरा बापट, काकडे आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी येऊन शिरोळेच्या स्नेहमिलनाला उपस्थिती दाखवली. अंतर्गत कुरघोड्या करणारे हे तिन्ही नेते जेव्हा एकत्रित स्टेजवर आले तेव्हा मात्र खेळीमेळीने संवाद करताना दिसत होते. त्यामुळे शिरोळे यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम बापट, काकडे, शिरोळेचा मनोमिलन कार्यक्रम ठरला का या बाबत सर्वत्र कुजबुज सुरू होती.