यूपीएमध्ये सहभागाची घोषणा : शेतकर्यांसाठी घेतला निर्णय : खा. शेट्टी
नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)मध्ये आपली संघटना सहभागी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासोबत खा. शेट्टी यांची नवी दिल्लीत प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची साथ सोडत असल्याची घोषणा खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी खा. चव्हाण यांचीदेखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकाही केली. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही यूपीएमध्ये आलो आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले. 2019ची लोकसभा व विधानसभा निवडणूक यूपीएचा घटकपक्ष म्हणूनच लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
शेतकरी प्रश्नांवरून राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र डागणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची सोमवारी नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांच्या यूपीए प्रवेशाबाबत चर्चा झाली. 29 मार्चरोजी देशातील शेतकरी संघटनांची बैठक होणार असून, या बैठकीचे निमंत्रणदेखील खा. शेट्टी यांनी राहुल गांधी यांना दिले. या भेटीच्या वेळी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हेदेखील उपस्थित होते. 2014च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएसोबत होती. त्यामुळे उसउत्पादक पट्ट्यात भाजपला त्यांचा चांगलाच राजकीय फायदा झाला होता.
नाराजीमुळे एनडीएतून बाहेर!
शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत भाजप सरकारला शेतकर्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. सत्तेत सहभागी असूनही राजू शेट्टी कमालीचे नाराज होते. त्यामुळेच सत्तेला रामराम ठोकून ते एनडीएमधून बाहेर पडले होते. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.