मुंबई । शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे विमानप्रकरण घडल्यानंतर सर्वच विमान कंपन्या एकवटल्या होत्या. या कंपन्यांनी तेव्हा प्रवाशांच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा लावून धरला होता. मात्र आता जेट एअरवेज या विमान कंपनीचाच बेजबाबदारपणा उघड झाला आहे. स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना जेटच्या बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. जेट एअरवेज कंपनीच्या विमानाने खासदार राजू शेट्टी दिल्लीला निघाले होते. त्यांनी बोर्डिंगपासही घेतला होता. मात्र तरीही त्यांना खालीच सोडून जेट एअरवेजचे विमान दिल्लीला निघून गेले. याच घटनेमुळे आता विमान कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
काय घडले शेट्टींसोबत?
खासदार राजू शेट्टी बुधवारी सकाळी 6 वाजता दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले. त्यांनी बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. त्यामुळे नियमाप्रमाणे तासभर आधीच शेट्टी यांनी बोर्डिंग पास घेतला. मात्र विमानाच्या उड्डाणाला अवकाश असल्याकारणाने शेट्टी प्रतीक्षा करत लॉन्जमध्ये बसले होते. त्यांनी तशी रजिस्टरमध्ये नोंदही केली होती. खासदार राजू शेट्टी हे कधीही व्हीआयपींसाठी असलेला प्रोटोकॉल घेत नाही. तशी त्यांची ख्यातीच आहे. इतकेच नाही तर ते मदतनीस देखील घेत नाहीत. त्यामुळे काही वेळच्या प्रतीक्षेनंतर ते बोर्डिंग करता लॉन्जबाहेर आले तेव्हा त्यांना बोर्डिंगद्वार बंद झाल्याचे सांगण्यात आले. बोर्डिंग पास घेतला असूनही राजू शेट्टी यांना न घेता विमानाने उड्डाण केले होते.
खा. शेट्टींना दोन हजाराचा भूर्दंड
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड चर्चेत आले होते. त्यानंतर एअर इंडिया व फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने रवींद्र गायकवाड यांना प्रवासबंदी केली होती. एखाद्या खासदारावर अशी बंदी घातली जाण्याची ती पहिलीच वेळ होती. यात इंडिगो, जेट एअरवेज, स्पाइस जेट व गो एअर या विमान कंपन्यांचा समावेश होता. त्यानंतर विस्तारा एअरलाइन्सनेही अशीच बंदी घालण्याचे संकेत दिले गेले. खासदार राजू शेट्टी यांनी घडल्याप्रकाराबाबत संबंधित अधिकार्यांना जाब विचारला. तेव्हा जेटच्या अधिकार्यांनी आपली जबाबदारी झटकली. आपण एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीला जात आहोत. त्यामुळे आपली दिल्लीला जाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी शेट्टी यांनी त्या अधिकार्यांना विनंतीही केली. मात्र, त्यांना 7 वाजताच्या विमानाचे बदली तिकीट देण्यात आले. यासाठी मात्र त्यांच्याकडून अतिरिक्त 2000 रुपये विमान कंपनीने वसूल केले.