पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील आयआयटीच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते सुळे यांना गौरवण्यात आले. यावेळी आयआयटी मद्रासचे डायरेक्टर भास्कर राममूर्ती, प्राईमटाईम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कामकाजातील सहभागाचा निकष
दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे 9 वे वर्ष आहे. लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणार्या खासदारांना प्राईमटाईम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन प्रिसेन्सच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चेमधील सहभाग, सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न आणि त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात मांडलेली खासगी विधेयके आणि मतदारसंघात खासदार निधीचा केलेला वापर या निकषांवर या पुरस्कारासाठी खासदाराची निवड केली जाते. ज्येष्ठ संसद सदस्यांचा समावेश असलेली समिती या पुरस्कारासाठी खासदाराची निवड करते. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खा. आनंदराव अडसूळ आणि अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांचा सुळे यांच्याशी संवाद
पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणार्या जनतेचा आहे. हा पुरस्कार जनतेला समर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार वितरणानंतर आयआयटी मद्रासमधील काही निवडक विद्यार्थ्यांनी सुळे यांच्याशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांसमोर मतदारसंघात विकास साधण्यासाठी संसदेतील प्रभावी कामगिरी कशी साहाय्यभूत ठरते, तसेच सभागृहात प्रश्न मांडून ते तडीस कसे न्यावेत, याविषयी एक सादरीकरणही केले.