जळगाव । शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्कमधील एकाच लाईनीतल्या चार घरांच्या स्लाईडींगच्या खिडक्या उघडून चोरट्यांनी महागडे मोबाईल, पाकिट तसेच पैसे लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी चारही घरमालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर चोर्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना दिसून येत आहे तर पोलिसांना चोरांना पकडण्यात अपयश येत असल्याचेही चित्र शहरात पहावयास मिळत आहे. चोरट्यांनी चारही घरामध्ये केलेली चोरीची एकच पध्दत वापरण्यात आली आहे.
घटना क्रं. 1
शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथील रहिवासी मुस्ताक करीमी हे सोमवारी जेवन झाल्यानंतर कुटूंबियासोबत घरात झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराची स्लाईडींग खिडकी उघडली आणि चार्जींगला लावलेला चार हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. दरम्यान, मुस्ताक मरीमी यांचा यापूर्वी देखील अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी खिडकीत ठेवलेला मोबाईल चोरीला गेला होता. तर सोमवारी मध्यरात्री पून्हा त्यांचा आणखी एक मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी मुस्ताक करीमी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्रं. 2
उस्मानिया पार्कमधील मुस्ताक करीमी यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारीच राहणारे नाजीम सुपडू शेख यांच्या घराकडे मोर्चा वळविला. मुस्ताक यांच्या घरी केलेल्या चोरी प्रमाणेच चोरट्यांनी नाजीम शेख यांच्या घराची देखील स्लाईडींगची खिडकी उघडून खिडकीत ठेवलेला पंधरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल व पँन्टमधील आठशे रुपये चोरून नेले. सकाळी नाजीश शेख यांना जाग आल्यानंतर त्यांना मोबाईल गायब झालेला दिसला. तर घराबाहेर त्यांची पँन्ट पडलेली मिळून आली. त्यातील पैसे तपासले असता ते देखील गायब झाल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याचे त्यांना खात्री झाली.
घटना क्रं. 3
सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी केल्यानंतर शकील इब्राहीम शेख यांच्या घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत पुन्हा खिडकीतून पाकिट बाहेर काढत त्यातील 1800 रुपये चोरले आणि पाकिट फेकून दिले. यातच खिडकीत ठेवलेले सात हजार रुपये किंमतीचा मोबाईलीही चोरून नेला. सकाळी जाग आल्यानंतर शकील इब्राहीम शेख यांना पाकिटातील पैसे व मोबाईल गायब झाल्याचे दिसताच चोरट्यांनी खिडकी उघडून चोरून नेल्याचे त्यांना खात्री होताच त्यांनी सकाळीच शहर पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्रं. 4
चोरट्यांनी तीन ठिकाणी एकाच प्रकारच्या पध्दतीने चोरी केल्यानंतर चोरट्यांनी पून्हा आपला मोर्चा सलीम खान मुसा खान यांच्या घराकडे वळला. चोरीच्या त्याच पध्दतीने म्हणजेच खिडकी उघडून चोरट्यांनी पाकिटातील 12 हजार रूपये व सोळा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. दरम्यान, सकाळी घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. यातच उस्मानिया पार्कमधील एकाच लाईनीत चोरट्यांनी एकाच पध्दतीन ेचोरी करत एकूण चार महागडे मोबाईल व 14 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी चारही घरमालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.