रावेर : तालुक्यातील खिरवड येथे अवैधरीत्या सुरू असणार्या गावठी दारूच्या भट्टीवर धाड टाकून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असून हातभट्टीला देखील ऊत आला आहे. या अनुषंगाने रावेर पोलिसांनी तालुक्यातील खिरवड येथे धाड टाकली. यात 72 प्लास्टीकच्या कॅनमध्ये भरलेली दारू तसेच गावठी दारू भरण्यासाठी लागणारे रसायन व अन्य सामग्री जप्त करण्यात आली. याप्रसंगी येथे दोन जण आढळून आले . पोलिस कॉन्स्टेबल तुषार मोरे यांच्या फिर्यादीवरून मनोहर प्रकाश उर्फ बदरु कोंघे व जमाल अशोक गाढे (दोन्ही रा.खिरवड) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरीफ तडवी, जितेंद्र नारेकर, तुषार मोरे, होमगार्ड हेमचंद्र सैतवाल व अमीन तडवी यांच्या पथकाने केली.