खिरोद्याजवळ दोन आयशर समोरा-समोर धडकल्या : 25 वर्‍हाडी जखमी

रावेर/सावदा : सावद्यापासून जवळ असलेल्या खिरोदा गावाजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या दोन आयशर समोरासमोर धडकल्यानंतर झालेल्या अपघातात आयशर चालकांसह सुमारे 25 वर्‍हाडी गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी घडला.

सावदा पोलिसात अपघाताची नेांद
वाघोदा बुद्रुक येथील लग्नाचे वर्‍हाड घेवून जाणारा आयशर ट्रक (एम.एच.19 जे.7738) चिंचाटीकडे जात असताना खिरोदा गावाच्या जवळ पालकडून येणारा आयशर (एम.एच.18 ए.ए.2020) मध्ये समोरा-समाचेर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील वर्‍हाडी जखमी झाले. हा अपघात रविवार, 13 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात वर्‍हाडी घेवून जाणार्‍या आयशरमधील 25 जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनेकांनी घेतली धाव
अपघातानंतर खिरोदा गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोविंदा चौधरी, ग्रामंचायत सदस्य ललित चौधरी, रुपेश पाटील, सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, कॉन्स्टेबल मेहेरबान तडवी यांनी जखमींना प्रथम खिरोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर अन्य रुग्णवाहिकेने सावदा व फैजपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.