खिरोद्यानजीक जुगार अड्ड्यावर धाड ; तिघांना अटक

0

फैजपूर- खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणार्‍या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून सहा हजार 530 रुपयांच्या रोकडसह मोबाइल व दुचाकी मिळून 38 हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले तर तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांंना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पोलीस कर्मचारी रफिक शेख कालू, विजय नामदेव सोनवणे, सुनील दामोदरे, अजय पाटील या पथकाने खिरोदा रस्त्यावर चालणार्‍या जुगार अड्ड्यावर धाड घातली. जुगार खेळताना संदीप श्रावण चौधरी (रा.सावदा), इमाम गंभीर तडवी (रा.खिरोदा), नितीन जगन्नाथ चौधरी (रा.चिनावल) या तिघांना पोलिसांनी अटक केली तर जुबेर नदीम शेख, मोसिन उर्फ लंगडा राजू हे पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींकडून सहा हजार 530 रुपये रोख व मोबाइल, मोटारसायकल असा एकूण 38 हजार 980 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल अजय पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली किरण साठे करीत आहेत.