खिर्डी आरोग्य केंद्राचे ‘आरोग्य’च धोक्यात

खिर्डी (सादिक पिंजारी) : निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या खिर्डी खुर्द गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यात व विखळ्यात अडकले आहे. आरोग्य उपकेंद्राच्या अवती-भवती मोठ्या प्रमाणात वस्ती असून तेथील काही ग्रामस्थ आरोग्य केंद्रात आपली गुरे-ढोरे बांधत असल्याने जनावरांचे शेणखत व उकीरड्यांचे ढीगारे आरोग्य केंद्र परीसरातच टाकले जात असल्याने आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

घाणीमुळे रोगराईला निमंत्रण
विविध उपचारांसाठी रुग्ण खरे तर आरोग्य केंद्रात येतात मात्र रुग्णालयाच्या परीसरात चित्र पाहता रोगराईला आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. या आरोग्य केंद्राच्या परीसरात नेहमीच गुरे-ढोरे बांधलेली दिसून येतात त्यामुळे आरोग्य प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

आरोग्य सेविकेची प्रतीक्षा
आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेची बदली झाल्यामुळे नूतन आरोग्य सेविकेची प्रतीक्षा आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.खिर्डी खुर्द या गावाची लोकसंख्या मोठी असल्याने या गावात एकच उपकेंद्र असल्याने त्यात खिर्डी तसेच रेंभोटा व वाघाडी, भामलवडी, पुरी-गोलवाडे, शिंगाडी आदी अनेक खेडे व वस्त्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याची हेळसांड होते तर रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयाचा आसारा घ्यावा लागतो. सध्या कोरोनामुळे आधीच ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याने आरोग्य प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची अपेक्षा आहे.