खिर्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भवितव्य धोक्यात

0

आरोग्य विभागाचे लक्ष देण्याची अपेक्षा : नवीन इमारतीची मागणी

खिर्डी : निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या खिर्डी खुर्द प्राथमिक उपकेंद्राची इमारत अखेरची घटीका मोजत असून हे आरोग्य उपकेंद्र बांधून आज जवळपास 25-30 वर्षे पूर्ण झाले आहेत. लोडबेअरींगच्या कामामुळे इमारतीच्या भिंती तसेच छत आजघडीला जीर्ण झाले आहे. खिर्डी खुर्द गावाची लोकसंख्या जवळपास साडेचार ते पाच हजार असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना या जीर्ण इमारतीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कालबाह्य इमारतीला पावसाळ्यात गळती लागते त्यामुळे पावसाळ्याआधीच येथे इमारत नवीन होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या या उपकेंद्रात उपचार करून घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

डिलिव्हरी वॉर्डाची दयनीय अवस्था
या प्राथमिक उपकेंद्रात महिलांच्या प्रसुतीसाठी एकच वॉर्ड असून त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या वॉर्डाची इमारत पूर्णपणे जीर्ण असून पावसाळ्यात बेडवर्ती प्लास्टिक झाकून ठेवले जातात तसेच यातील भिंतीमध्ये जागोजागी तडे पडलेले असुन ज्यामुळे महिलांच्या जिवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आह .त्यामुळे गावात महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

पावसाळ्याधी नवीन इमारत बांधण्याची मागणी
इमारत लोडबेरिंग ची असल्यामुळे इमारतीला जवळपास 25-30 वर्ष पूर्ण झाले असून या इमारतीच्या भींतीला तडे तसेच ठिकठिकाणी फरश्याही उखडल्या आहेत. येथील डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर तसेच गावातील ज्या महिला येथे तपासणीसाठी येतात त्यांना सुद्धा ही इमारत कोसळण्याची भीती असल्याने आरोग्य विभागाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

पावसाळ्याआधी नवीन इमारत द्यावी -डॉ.चंदन पाटील
इमारत पूर्णपणे जीर्ण असून या उपकेंन्द्रात कोणतेही लसीकरण किंवा इतर कार्यक्रम घेण्यास येथे जागा कमी पडत असल्याने फार अडचणी निर्माण होतात तसेच येथे लहान बाळाला लस, गर्भवती महिलांची चाचणी तसेच प्रसूती होते असल्याने या ठिकाणी नवीन इमारतीची अत्यंत गरज असून शासनाने पावसाळ्याआधी नवीन इमारत उपलबध करून द्यावी, असे डॉ.चंदन पाटील यांनी सांगितले.

सा.बां.विभागाने दखल घ्यावी – साबीर बेग
जीर्ण इमारतीमुळे येथील प्रसूतीसाठी जाणार्‍या महिलांना, लहान बालकांना तसेच डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या जीवाला धोका असून शासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर नवीन इमारत या ठिकाणी उभारावी, अशी मागणी खिर्डी युवा सेनेचे उपतालुका प्रमुख साबीर बेग यांनी केली आहे.