खिर्डी बुद्रूकचे दोन तरूण बेपत्ता

0

भुसावळ। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रूक येथील रहिवाशी वीस वर्षीय दोन तरूण मुंबई येथे एकाच्या बहिणीस सोडून मुंबई-भुसावळ पॅसेंजरने भुसावळ येथे परतले मात्र घरी पोहोचलेच नसल्याने येथील रेल्वे पो.स्टे.ला दोघे हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

खिर्डी बुद्रूक येथील रहिवाशी चेतन गोपाळ जाधव (वय 20) व दिपक संतोष कोचूरे (वय 20) हे दोन्ही तरुण 13 रोजी दिपक कोचूरे याच्या बहिणीस मुंबई येथे सोडायला गेले होते. तेथून हे दोन्ही 17 रोजी मुंबई-भुसावळ पॅसेंजरने घराकडे परतले. दरम्यान, चेतन याचा भाऊ प्रविण गोपाळ जाधव याने 17 रोजी चेतन यास रात्री 8.30 वाजता फोन लावला असता हे दोन्ही पॅसेंजरने भुसावळ येथे आले असून खिर्डी बुद्रूककडे घरी येत असल्याचे चेतनने सांगितले. मात्र त्यानंतर हे दोन्ही खिर्डी बुद्रूक येथे घरी पोहोचले नाही व त्यांचा संपर्कही झाला नाही, अशी खबर प्रविण गोपाळ जाधव यांनी दिल्याने भुसावळ रेल्वे पो.स्टे.ला मिसींग रजि. क्र. 10/17 प्रमाणे नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार राजू पवार करीत आहे.