हडपसर । ‘एकता हे देशापुढील मोठे आव्हान असून प्रदेश, धर्म, जात, लिंग या घटकांमध्ये समानता राखून सर्व नागरिकांनी राज्य घटनेचा सन्मान केला पाहिजे. खेळातील खिलाडू वृत्तीतून प्रत्येकाने इतरांचा आदर केला पाहिजे. खिलाडू वृत्तीनेच तत्त्वासाठी झगडावे. खेळाडूने खेळाप्रमाणेच कोणत्यातरी एका कलेचा छंद जोपासावा. नाद, ताल, माधुर्य यांचे समायोजन करून खेळाचा उत्सव साजरा करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 29 व 30 डिसेंबरला श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे उद्घााटन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनेत्रा पवार, विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, सिनेअभिनेत्री श्वेता शिंदे, बाळासाहेब लांडगे, पै. अभिजित कटके, जालिंदर कामठे, अभिषेक बोके, राजेंद्र घाडगे, अॅड. संदीप कदम, अॅड. मोहनराव देशमुख, एल. एम. पवार, ए. एम. जाधव आदी उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल,योगासने, कुस्ती, बुद्धिबळ, तायक्वांदो, बुडो मार्शलआर्ट व मैदानी स्पर्धा तसेच वक्तृत्व, निबंध, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. संस्थागट पातळीवर व तालुका पातळीवर 11218 खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंपैकी जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये 4060 खेळाडू सहभागी झाले आहेत.डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, शिक्षण मंडळाच्या वतीने या पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अतिशय नेटकेपणाने संपन्न होत आहेत. विद्यापीठाच्या वतीने त्यांनी सर्व प्रकारातील स्पर्धांना शुभेच्छा दिल्या. बलशाली भारत बनविण्यासाठी मनाने व मनगटाने मजबूत होणे गरजेचे आहे. शौर्य, पराक्रम स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता वाढविण्यासाठी अशा स्पर्धांचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो.सिनेअभिनेत्री श्वेता शिंदे यांनी जिंकणारे जिंकणारच आहेत पण हरणार्यांनी सुद्धा खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. एल. एम. पवार यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा. हरिदास खेसे, शरद सस्ते व प्रा. शोभा तितर यांनी केले.