विविध सामाजिक संस्थांच्यावतीने ही मोहिम सुरू
निगडी :अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत ‘खिळेमुक्त झाड’ हे अभियान गेले 8 महिन्यांपासून शहरात प्रभावीपणे सुरू आहे. काल प्राधिकरणातील सी.एम.एस. शाळेसमोरील रस्त्यावर हे अभियान राबवण्यात आले. शाळा असल्यामुळे इथे एका एका झाडावर 5 ते 6 क्लासचे बोर्ड अनधिकृतपणे लावण्यात आले होते. या 20 झाडांवरचे जवळपास 50 खिळे आणि तारा आणि 30 बोर्ड काढण्यात आले. स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहर म्हणून पिंपरी-चिंचवड हे शहर पुढे येत असताना झाडांवरचा कचरा मात्र प्रशासनाला दिसत नाही. नगरपालिकेत उद्यान आणि आकाश-चिन्ह विभागाकडे हवा तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे कारवाई होत नाही. त्यामुळे फ्लेक्स, बॅनर आणि खाजगी क्लासच्या जाहिरातींमुळे शहर बकाल होत चालले आहे.
आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले
अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड शहराचे सचिव राहुल धनवे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी विविध संस्थांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून झाडांवर जे खिळे ठोकून जाहिरात करतात त्यांच्यावर कारवाई म्हणून एक निवेदनसुद्धा दिले होते. परिसरातील खिळेमुक्त झाडांसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले पण आजतागायत एकही दंडात्मक कारवाई झाली नाही. नगरपालिकेतर्फे परिपत्रकसुद्धा वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आले होते. पण त्यावर कारवाई शून्य झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन काळभोर म्हणाले की, पालिकेने थुंकणार्यांवर कारवाई करण्यास चालू केले आहे पण झाडांबाबतीत प्रशासन उदासीन आहे. स्वच्छ भारत अभियानमध्ये संस्थेने जवळपास 3000 अनधिकृत बोर्ड आणि फ्लेक्स काढले आहेत. नगरपालिकेने लवकरच जर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली नाही तर पोलीस आयुक्तांना भेटून झाडांसाठी मदत मागणार असल्याचे सांगितले.