खिळे, पोस्टर लावल्यास करणार कारवाई
पिंपरी : मागील 11 आठवड्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात खिळेमुक्त झाडे करण्यासाठी अंघोळीची गोळी आणि अन्य सामाजिक संस्थांच्या मदतीने खिळेमुक्त झाडांचे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी नागरिकांचा तसेच लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील हातभार लावला आहे. ‘अ’ प्रभागात झाडांवर खिळे ठोकल्याप्रकरणी तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अंघोळीची गोळी आणि परिसरातील विविध सामाजिक व पर्यावरण प्रेमी संघटनांच्यावतीने ‘खिळेमुक्त झाडे’ हे अभियान मंगळवारी (दि. 29) प्राधिकरणातील भेळ चौक येथे राबविले. अभियानात नगरसेविका शर्मिला बाबर, सूर्यकांत मुथीयान, गिरीश आफळे, राजेंद्र बाबर, दत्तात्रय जोशी, संदीप रांगोळे, रोहित शेणॉय, प्राजक्ता रुद्रावर, सचिन काळभोर, राहुल धनवे, अन्वर मुलाणी, केतकी, पानसे, कारेकर आदींनी सहभाग घेतला.
यावेळी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवकांनी झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढले. त्याच वेळी ‘अ’ प्रभागाच्या अधिकार्यांनी संबधित दुकानदार व व्यक्तींना खिळे ठोकल्याबद्दल समज दिली. सामाजिक संस्थांच्या कामाला प्रशासनाने देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा महापालिका आयुक्तांकडे व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना आदेश दिले. त्यानुसार ‘अ’ प्रभागाचे अधिकारी एम. एम. शिंदे आणि बापूसाहेब गायकवाड यांनी झाडांवर खिळे आणि बॅनर लावल्याबद्दल तीन दुकानदारांवर कारवाई करत दुकानदारांकडून दंड वसूल केला.