खिशातून पडून एटीएम गहाळ ; सेवानिवृत्त जि.प. कर्मचार्‍याला 60 हजारांचा गंडा

0

एटीएमवरच पीन क्रमांक लिहलेला असल्याने अज्ञात व्यक्तीला चांगलेच फावले

जळगाव– किराणा तसेच पेट्रोल भरण्याकामी मुलासोबत घराबाहेर पडले. अन् पुन्हा घराकडे परतत असतांना खिशातील एटीएम रस्त्यावर कुठेतरी पडले आणि गहाळ झाले. या गहाळ एटीएमव्दारे अज्ञात व्यक्तीने साठ हजार रुपये काढून घेवून जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी रामू वामन वानखेडे रा. जिवराम नगर यांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. एटीएम कार्डवरच वानखेडे यांनी पिन क्रमांक लिहलेला होता, तसेच तत्काळ एटीएमकार्ड गहाळ झाल्यानंतर खाते बंद न केल्याने पैसे काढणार्‍याला चांगलेच फावले व त्याने दोन दिवसात तब्बल 60 हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे.

खिशातून पडले एटीएम रस्त्यावर

जिवराम नगर येथे रामू वानखेडे हे पत्नी , तीन मुले, दोन सुना यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते जिल्हा परिषदेत नोकरीला होते. 2017 मध्ये निवृत्त झाले. 25 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास वानखेडे हे मुलगा गोपाल याच्यासह दुचाकीने किराणा घेण्यासाठी बाहेर पडले. दुचाकीच पेट्रोल कमी असल्याने पेट्रोल टाकण्यासाठी गुजराल पेट्रोल पंपावर गेले. मात्र पेट्रोलपंप बंद असल्याने पेट्रोल न टाकताच पर घरी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान गुजरात पेट्रोलपंप ते खोटेनगर दरम्यान वानखेडे यांच्या खिशातील त्यांचे कॅनरा बँकेचे एटीएम कुठेतरी पडले अन् गहाळ झाले. शोध घेतला असता सापडले नाही. कॅनरा बॅकेतही प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी संपर्क साधला. मात्र खात्याची मोबाईल नंबर लिंक नसल्याने उपयोग झाला नाही व कोणतील माहिती मिळू शकली नाही.

दोन दिवसात एटीएमव्दारे 60 हजार काढले

वानखेडे यांनी एटीएमकार्डच्या पाकीटावर एटीएमचा पीन क्रमांक लिहिलेला होता. त्यामुळे ज्या अज्ञात व्यक्तीला एटीएमकार्ड सापडले. त्याला सहज पैसे काढता आले. 25 रोजी संबंधित अज्ञात व्यक्तीने गणेश कॉलनी, तसेच गुजराल पेट्रोल पंप परिसरातील एटीएमवरुन 40 हजार रुपये काढले. यानंतर भामट्याने पुन्हा दुसर्‍या दिवशी 26 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दादावाडी येथील एटीएम व्दारे 20 हजार रुपये काढले. भामट्याने प्रत्येक वेळी दहा हजार याप्रमाणे असे दोन दिवसात साठ हजार रुपये काढले. यानंतर वानखेडे यांनी विसजनी नगर शाखा येथे जावून एटीएमकार्ड ब्लॉक केले. त्यामुळे खात्यातील उर्वरीत रक्कम शिल्लक राहिली. याप्रकरणी वानखेडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल शेखर जोशी तपास करीत आहेत.