खुद्द शिक्षणमंत्र्यांची कबुली, अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव!

0

69 टक्के शाळांमध्ये शौचालयांची स्वच्छता नाही
आठ जिल्ह्यातील 122 शाळांमध्ये करून दोन सामाजिक संस्थांचे सर्व्हेक्षण

मुंबई (निलेश झालटे) :- स्कूल चले हम, सर्व शिकूया पुढे जाऊया यांसारख्या अनेक घोषणांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रति जनजागृती केली जात असताना दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षणासाठीच्या मूलभूत सुविधांचा देखील अभाव असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याची अंशतः का होईना पण कबुली खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबाबत आमदार सुनील शिंदे यांच्यासह 38 आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता.

चाईल्ड राईट्स अँड यु (क्राय) आणि बाल हक्क अभियान यांच्या सर्वेक्षणात शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी, खेळाचे मैदान व ग्रंथालय नसणे तसेच 13 टक्के शाळांना इमारती नसल्याचे, 21 टक्के शाळांना संरक्षण भिंत नसल्याचे तर 57 टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची नेमणूकच नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांनी ही परिस्थिती अंशतः खरे असल्याचे सांगितले आहे. राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने सदर दोन्ही संस्थांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, गडचिरोली, औरंगाबाद, परभणी, लातूर आणि बीड या आठ जिल्ह्यातील 122 शाळांचे सर्वेक्षण करून ही माहिती समोर आली आहे, यालाही शिक्षणमंत्र्यांनी लेखी उत्तरात दुजोरा दिला आहे.

अनेक शाळांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी सोया नसल्याने विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे तर 69 टक्के शाळांमध्ये शौचालय असले तरी त्याची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नसल्याने ते काम विद्यार्थी आणि शिक्षकांना करावे लागत असल्याबाबत प्रश्न केला असता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आले असल्याचे व शाळांमधील स्वच्छता विद्यार्थी व शिक्षकांमार्फत केली जात नसल्याचे तावडे यांनी उत्तरात म्हटले आहे.