खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

0

चाकण : येथील एका हॉटेलात 21 जुलै 2013 रोजी रात्री नितीन लक्ष्मण विरणक (वय 25, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) या तरुणाचा गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडून खून झाला होता. या खूनप्रकरणातील संशयित आरोपी अमर उर्फ अमरदीप बाजीराव बनसोडे (वय 28, रा. चव्हाणवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास कोरोची (ता. हातकणंगले) येथील वासुदेव कारखाना परिसरातून अटक केली. त्यास न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमर हा गुन्हा खडल्यापासून, म्हणजेच गेल्या चार वर्षांपासून फरार होता. तो वेळोवेळी नाव व पत्ता बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

दोन आरोपी अद्यापही फरारच
या गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश भालेराव (रा. म्हाळुंगे, ता. खेड) यास पोलिसांनी नाकाबंदीमध्येच पकडले होते. तर इतर आरोपी फरार झाले होते. अटकेत असलेला आकाश हा सध्या येरवडा कारागृहात आहे. या प्रकरणातील दोन आरोपी सचिन सावंत व बाल्या (पूर्ण नाव नाही) अद्याप फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पथक नेमले होते. सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, विद्याधर निचित, महेश गायकवाड, नीलेश कदम, रवी शिनगारे, बाळासो खडके यांनी अमर बनसोडे याला अटक केली.