जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा संशयीत आरोपी 14 दिवसांच्या संचित रजेवर आला व संशयीताने पुन्हा संचित रजा घेतली मात्र त्यानंतरही संशयीत कारागृहात हजर होणे अपेक्षित असताना संशयीत हजर झाला नाही. आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते व तब्बल 12 वर्षानंतर त्यास अटक करण्यात जळगाव गुन्हे शाखेला यश आले. मुक्तार जव्वार तडवी (49, रा. पिंपळगांव हरेश्वर ह.मु. खडकदेवळा ता.पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अटकेतील आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
आरोपी मुक्तार जब्बार तडवी याने मुनीर कुतब्बुद्दीन तडवी (रा.पिंपळगांव हरेश्वर, ता.पाचोरा) याच्या पोटावर चाकूने हल्ला करून खून केला व त्यास 2006 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. आरोपीची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली व 29 जून 2010 रोजी त्यास 14 दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्याने पुन्हा 14 दिवस संचित रजेची वाढीव मंजूरी घेतली मात्र 22 ऑक्टोबर 2010 रोजी आरोपीने कारागृहात हजर होणे अपेक्षित असतानाही तो हजर न झाल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते मात्र आरोपी गवसत नव्हता.
यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरोपी हा खडकदेवळा गांवात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, एएसआय अशोक महाजन, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.