खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताचा टिक-टॉक बनविणे भोवले; १२ जणांविरोधात गुन्हा

0

जळगाव – खुनाच्या गुन्ह्यात सध्या कारागृहात असलेल्या अमोल नाना सोनवणे (मराठे) या संशयिताचे न्यायालयाच्या आवारात टीकटॉक व्हिडीयो तयार करण्यात येवुन ते व्हायरल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यापैकी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी ताब्यात घेतले.

काय आहे नेमका प्रकार

अमोल मराठे याने सप्टेबर २०१९ मध्ये खेडी गावात राहणाऱ्या बिपीन मोरे यांचा चाकुने भोसकुन खुन केल्याप्रकरणी तो सध्या कारागृहात आहे. त्याला न्यायालयात हजर करतानाचे त्याच्या मित्रांनी चक्क टीकटॉक व्हिडीओ तयार केले. ५९ सेंकदाच्या व्हिडीअोमध्ये विविध चित्रपटातील डायलॉग वापर करण्यात आला आहे. तसेच तो टीकटॉकचा व्हिडीअो व्हायरल करुन संशयित अमोलची मुजोरी, दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिस अधीक्षकांकडुन गंभीर दखल ; चौकशीचे आदेश

पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना चौकशीचे आदेश दिले होते.

पथकाकडुन चौकशी ; १२ जणांविरोधात गुन्हा

त्यानुसार पोलिस निरीक्षक बापू राेहोम, पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, सुधाकर अंभोरे, अनिल देशमुख, दर्शन ढाकणे, महेश पाटील, नितीन चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, , दिनेश बडगुजर यांच्या पथकाने या व्हिडीओची चौकशी केली. पथकाला विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांनी तांत्रिक सहकार्य केले. चौकशीअंती याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे शरद भालेराव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार जणांसह एक अल्पवयीन ताब्यात

गुन्हा दाखल झालेल्या १२ जणांपैकी अरुण नाना सोनवणे (मराठे, वय २२, रा.रामेश्वर कॉलनी), आनंद हरी पाटील (वय १८, रा.खेडी, ता.जळगाव) व दीपक रमेश हटकर (वय २२, इंदिरानगर, खेडी, ता.जळगाव), ईश्वर अशोक राऊत ( वय २१ रा.ममता हॉस्पिटलजवळ मेहरूण जळगाव) व एक अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे.

 

कोणीही समाजात तेढ निर्माण करणा-या पोस्ट्स, अफवा ,WhatsApp ,Tik Tok, Facebook, सारख्या इतर अॅपव्दारे पसरविणा-या

विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात सोशल मिडीयावर प्रक्षोभक पोस्ट / वक्तव्ये करणार्‍यांवर जळगाव जिल्हा

पोलीस दल लक्ष ठेवून आहे. आपणास जर अशा पध्दतीच्या पोस्ट , ऑडिओ, व्हीडीओ, मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या त्वरील डिलीट कराव्यात व अशा बद्दलची माहीती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन ,कंट्रोल रुम यांना कळवावी, अफवांवर विश्वास ठेवु नये.

डॉ.पंजाबराव उगले , पोलिस अधीक्षक, जळगाव