भुसावळ : भुसावळ उपविभागात 2015 हे वर्ष खूप वादग्रस्त ठरले यावेळी खूनाचे प्रमाण वाढलेले होते. मात्र गेल्या वर्षभरात अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले असून येथील पोलीस कर्मचार्यांची समाधानी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली. वार्षिक तपासणी निमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक सुपेकर यांनी सोमवार 9 रोजी उपविभागीय कार्यालयासह पोलीस स्थानकांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा जाणून घेतला. यावेळी डिवायएसपी कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.
शहरात जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली
यानंतर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस स्थानकात पोलीस दरबार घेवून पोलीस कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सुपेकर म्हणाले की, 2015 या वर्षात पाहिले असता भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणावर खुनाचे सत्र सुरु होते. मात्र यानंतर पोलीस प्रशासनाने योग्य पाऊले उचलल्याने या घटनांवर नियंत्रण मिळविले. मागील डिवायएसपी रोहिदास पवार यांची कामगिरी चांगली होती. तसेच नवनियुक्त डिवायएसपी निलोत्पल यांचेही कार्य चांगले असल्याचे सांगून शहरात जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सुपेकर यांनी दिली.
उपविभागात 82 गुन्हे प्रलंबित
शहरात 16 पैकी 13 गुन्ह्यांचा तपास लागला असून भुसावळ उपविभागात 82 गुन्हे प्रलंबित आहेत. यात 700 मुद्देमाल निर्गती केला त्यातील दारु, गुटखा सारखा जप्त करण्यात आलेला माल नष्ट करण्यात आला असल्याचेही डॉ. सुपेकर यांनी सांगितले. चोरी, दरोड्याच्या घटनेचा तपास लावण्यासाठी खंडव्याला पथक रवान करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंद चौक्या सुरु करणार
शहरात पोलीस कर्मचार्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे काही पोलीस चौक्या या बंद ठेवाव्या लागतात. त्या पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्यासंदर्भात देखील विचार करण्यात येत आहे. ज्या- त्या भागातील बिट कर्मचार्यांनी आपले कामकाज या चौक्यांमधूनच सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच कमी असलेल्या संख्याबळावर मात करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करुन कामकाज केले जात असल्याचेही पोलीस अधिक्षक सुपेकर यांनी सांगितले. शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतुक शाखेकडे जास्त लक्ष दिले जाणार असून पार्किंग, सिग्नल यंत्रणा या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. वाहनधारकांना शिस्त लावण्याची आवश्यकता असून रस्त्यावर पट्टे मारणे, एकतर्फी वाहतूकीबाबत योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक डॉ. सुपेकर यांनी जामनेर रोडवरील सुरु असलेल्या तालुका पोलीस ठाणे, कंट्रोल, उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी केली.