खुल्या भूखंडावर होणारा व्यावसायीक वापर थांबवा

0

जळगाव । दिक्षीतवाडी येथील खुल्या भुखंडाच्या विषयावर महासभेत गोंधळाचे वातावरण होते. गेल्या 35 वर्षापासून दिलेला खुला भुखंड हा पुन्हा शासनाच्या नियमानूसार देण्याबाबतच्या विषयावर महासभेत आला असता मनसे नगरसेवक अनंत जोशी यांनी शहरातील खुलेभुंखडावर होणारे व्यवसायीक वापराचा मुद्दा पुन्हा सभागृहासमोर मांडला. भाजपच्या नगरसेवकांनी दिक्षीतवाडी येथील खुल्या भुखंडाच्या विषयाला विरोध दर्शवून या जागेचा प्रश्‍न गोलमाल असल्याचा आरोप केला. महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवार 24 जुलै रोजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उपमहापौर ललित कोल्हे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते.

अश्‍विनी देशमुख यांचा विरोध
विशेष महासभेत दिक्षीतवाडी येथील खुल्या भूखंडाच्या विषयावर चर्चा करीत जोशी यांनी शहरातील महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडाचा प्रश्‍न उपस्थित केला. यात जोशी यांनी सांगितलेकी जवळपास 200 खुले भूखंड अनेक संस्थांकडे पडून आहेत. तसेच काही संस्था त्यांचा व्यावसायीक वापर करीत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अशा व्यावसायीक वापराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज जोशी यांनी स्पष्ट केली. दिक्षीतवाडी येथील भुखंड 35 वर्षापूर्वी महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट मुंबईला गेल्या 35 वर्षापासून रुग्णालय तयार करण्यासाठी दिले. परंतू संस्थेने काहीच उपयोग केला नाही. ही जागा तिथल्या नागरीकांना विकसीत करण्यासाठी मागणी करत आहे. तर प्रशासनाकडून ही जागा संस्थेला देण्याबात का घाईत निर्णय घेत आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर आयुक्त श्री. निंबाळकर यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेवून उचीत कार्यवाही करणार असे सांगितले. यावेळी भाजपचे गटनेते सुनिल माळी यांनी या विषयाला विरोध दर्शवून जागेत गोलमाल असून आमचा विरोध असल्याचे सांगितले. तसचे राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी देखील या विषयाला विरोध दर्शवून निवेदन दिले. हा विषय बहूमताने मंजूर करण्यात येवून सर्व विषय मंजूर झाले.

गतीमंद मुलांना भोईटे शाळाच द्या
भाजपाचे रविंद्र पाटील यांनी उत्कर्ष मतीमंद शाळेतील विद्यार्थी गेल्या 10 वर्षांपासून शाळेची मागणी करीत असून त्यांना का ही शाळा देत नाही असा प्रश्‍न महापौरांना केला. यावेळी महापौरांनी तुम्हाला नटवर टॉकीजच्या मागील मनपाची शाळेचा पर्याय दिला आहे असे सांगितले. गतिमंद शाळेतील मुले, पालक तसेच शिक्षकांनी आज सकाळी पुन्हा मनपाच्या इमारतीजवळ येवून ठिय्या आंदोलन केले. तसेच लोकप्रतिनीधी, महापौर, आयुक्तांना निवेदन देवून जोपर्यंत शाळा देत नाही तोपर्यंत महासभेच्या दिवशी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

मोघम स्वरूपाचा प्रस्ताव
मौजे मेहरूण येथील सन 418/419 पैकी या जागेत असलेल्या टि.बी.दवाखाना स्वयंसेवी संस्थांना देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास भाजपा सदस्यांनी विरोध असल्याचा गटनेते सुनील माळी यांनी सांगितले. यावेळी महापौर लढ्ढा यांनीही जागेवर दवाखानाचे आरक्षण आहे. हा दवाखाना ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविला जाणार असल्याचे स्पष्ट केले. महापौरांच्या स्पष्टीकरणानंतरही सुनील माळी हे विरोधावर कायम होते. रविंद्र पाटील यांनी,सत्ताधारींकडून नेहमीच मोघम स्वरूपाचे प्रस्ताव आणले जात असल्याचा आरोप केला.

विरोध असेल तर मतदान घ्या
दिक्षीतवाडी येथील खुल्या भुखंडावर जोशी यांनी केलेल्या आरोपावर सभागृहनेते रमेश जैन बोलतांना म्हणाले, की जागेवर अतिक्रमण होते ते मनपाने काढून द्यायचे होते. पण मनपाने ती कार्यवाही केलीच नाही त्यामुळे ही जागा संस्थेच्या ताब्यात अद्याप मिळाली नाही. शासनाने गॅझेट काढले असून संस्थेला जागा कलम 91 अन्वये कार्यवाही करून देण्याचा नमुद केले आहे. याबाबत जर कोणाला विरोध दर्शविण्याचा असेल तर मतदान घ्या असे सभागृहात सांगितले.

दिशाभूल करून घेतल्या सह्या
दिक्षीतवाडीच्या खुल्या भुखंडाबाबत भाजपने केलेल्या विरोधानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका आश्‍विनी देशमुख यांनी विरोध दर्शविला. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या विरोध दर्शविण्याच्या निवेदनावर गायत्री शिंदे, दिपाली पाटील, शालिनी काळे यांच्या स्वाक्षरीदेखील होत्या. नंतर हे प्रकरण काय आहे हे कळाल्यावर या विषयाला विरोध नसून आमची दिशाभूल करून स्वाक्षरी घेतली असल्याचे नगरसचिवांना सांगून आमचा विरोध नसल्याचे सांगितले.

आयुक्तपदी निंबाळकरच हवेत
शहराच्या सर्व प्रश्‍नाला हातात घेवून तळमळीने सोडविण्याचे प्रयत्न केल्याने प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांचे सभागृह नेते रमेश जैन यांनी अभिनंदन केले. प्रभारी असले तरी जास्त काळ आयुक्त मिळावेत अशी सदिच्छा दिली. तर महापौर नितीन लढ्ढा यांनी प्रभारी आयुक्तांनी 24 दिवसांत 24 महिन्यांचा बॅकलॉग भरून काढल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच श्री. निंबाळकर यांच्याकडे जोपर्यंत जिल्हाधिकारीपदाचा पदभार असेल तोपर्यंत त्यांच्याकडे प्रभारी आयुक्तांचा देखील पदभार ठेवावा अशी मागणी राज्याकडे करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच श्री. निंबाळकर यांची बदली करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत असून त्यांचे प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन लढ्ढा यांनी केले. यासोबतच नागरिकांनी रस्त्यांवर उतरून जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीस विरोध करावा असेही लढ्ढा यांनी सांगितले. यानंतर सर्व पक्षीय गटनेत्यांनी प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांचे अभिनंदन केले.

टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा
कैलास सोनवणे यांनी सभेच्या सुरवातीलाच टीडीआर प्रकरणात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची तसेच सरकारी वकील केतन ढाके यांची सनद रद्द करण्याची मागणी तिन महिन्यापूर्वी केली होती. परंतू अजूनही याबाबत प्रशासनाने कोणतेही कार्यवाही केली नसल्याचा आरोप यावेळी सोनवणे यांनी केला. यावर आयुक्तांनी प्रकरणाची माहिती घेवून कार्यवाही करेल असे सांगितले. दरम्यान, विशेष महासभेत गिरणाटाकी परिसरातील खुल्या भुखंडाच्या जागेवर मुलींसाठी अभ्यासीका तयार करण्याचे विषय मंजूर होवून त्याची वर्कऑर्डर दिल्यानंतर विषय कसे काय रद्द केले जातात असा आरोप उज्वला बेंडाळे यांनी केला. निर्णय उचीत वाटत नसल्यात तीन महिन्यात ठराव नियमानूसार रद्द करू शकतात असे महापौरांनी सांगितले.