खुल्या विद्यापीठांच्या निर्मितीची गरज

0

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन : तिसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसचा समारोप

पुणे : वर्तमान काळात तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात पुढाकार घ्यावा. गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाची निर्मिती करावी लागणार आहे. शिक्षणामुळेच देश घडत असतो. ज्या देशात शैक्षणिक विकास नाही, त्या देशाला भविष्य नाही, असे सांगून आपल्याला जागतिक कसोटीवर उतरणारी खुली विद्यापीठे तयार करायची आहेत, असे उद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित तिसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोप सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. राजेंद्र शेंडे, डॉ. अनिल त्रिगुणायत, रवींद्र राजू, प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय. के. भट, डॉ. आर. एम. चिटणीस, श्रीहरी होनवाड, डॉ. सुधीर गव्हाणे आदी उपस्थित होते.

शिक्षण हेच भविष्य

शिक्षक हा देशाचे भविष्य घडविणारा असतो. दिक्षांत याचा अर्थ शिक्षांत नसून जन्मभर शिकत राहणे हा त्याचा खरा अर्थ आहे. भविष्यात सकारात्मक दृष्टीकोनावर आधारीत आणि संशोधनात्मक शिक्षणाची आवश्यकता असणार आहे. समीक्षात्मक विचार, सृजनात्मकता, भावनाप्रधान शिक्षण आणि कामातील एकाग्रता हे यशस्वी होण्याचे मार्ग आहेत. आपल्या सीमाच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची सवय सर्वांना असावी. शिक्षण हेच भविष्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.

शिक्षक परिषदा काळाची गरज

शिक्षकांच्या परिषदा भरविणे हा भारताचा ऐतिहासिक वारसा आहे. भारतात अशा प्रकारच्या शिक्षक परिषदा व्हाव्यात ही काळाची गरज आहे. जगात 5 ते 8 टक्के खर्च शिक्षणावर होतो. मात्र भारतात 3 टक्यापेक्षाही कमी खर्च शिक्षणावर होत असल्यामुळे योग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. केंद्र आणि राज्य सरकारांना या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे की, गरिब विद्यार्थ्यांना चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी अनुदान द्यावे. भारतात युवकांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांसमोर त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आव्हान आहे, असे डॉ. जी. विश्‍वनाथन यांनी सांगितले.

शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

शिक्षकांनी दूरदृष्टी आणि ध्यैयवाद या दोन गुणाच्या जोरावर आपला विकास करून ध्यैयवादी विद्यार्थी घडवावे. 21 व्या शतकात भारताला जर विश्‍वगुरू बनायचे असेल, तर शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे विश्‍वनाथ कराड यांनी सांगितले. राहुल कराड म्हणाले, विविध विषयाच्या तज्ज्ञांना एकत्र करत ही परिषद भरविण्यात आली होती. आम्ही पाश्‍चिमात्य देशांच्या शिक्षण पद्धतीकडे वळले पाहिजे. शिक्षक हे विचारवंत असतात. जागतिक स्तरावरील शिक्षक परिषद घेण्याचा आमचा मानस आहे. भविष्यात जगातील उच्च शिक्षणाचे मॉडेल तयार करावे लागेल, यामुळे देशाच्या उभारणीला मदत होईल, असे राहुल कराड यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाची कास धरा

पद्मश्री बाला व्ही बालचंद्रन म्हणाले, चांगला दृष्टीकोन असावा. भविष्यात भारत एक सूपर टीचर म्हणून उदयास येईल. कारण भारतीय युवकांकडे ज्ञानाचे भांडार आहे. हेच ज्ञानाचे भांडार जगाला ज्ञानी पिढी देईल. नवीन तंत्रज्ञानाची कास धरत युवा पिढीने शिकावे. सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात निपुण व्हावे. भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. एकमेकांमध्ये संवाद नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. कनेक्टिव्हीटी, ग्रामीण भागाचा विकास आणि कृषी क्षेत्राला पाठबळ देण्याची गरज आहे, असे पद्मश्री कोटा हरीनारायणा यांनी सांगितले.

जीवनगौरव प्रदान

व्हीआयटीचे संस्थापक जी. विश्‍वनाथन, पद्मश्री डॉ. बाला व्ही. बालचंद्रन आणि पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक, प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.