खुल जा सीम सीम!

0

बाबाच्या डेर्‍यात छापेसत्र : लक्झरी कार, जुन्या नोटा, हार्डडिस्क, प्लॅस्टिक चलन जप्त

सिरसा : निमलष्करी जवानांच्या अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि उच्च न्यायालयाच्या निगरानीखाली जिल्हा महसूल प्रशासन, सुरक्षा यंत्रणा यांच्यावतीने शुक्रवारी सिरसा येथील डेरा सच्चा मुख्यालयात छापेसत्र राबविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे छापे सुरुच होते. या छाप्यात विनाक्रमांकाच्या लक्झरी कार, मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा, महत्वपूर्ण हार्डडिस्क, प्लॅस्टिक चलन आदी साहित्यांसह इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य आढळून आले असून, महसूल प्रशासनाने ते जप्त केले आहे. गुरुमीत रामरहीम सिंग याच्या आलिशान खोल्यांतही छापे मारण्यात आले असता, तेथे अनेकप्रकारची औषधी, त्याचे खासगी साहित्य आढळून आले. ते जप्त करत त्याच्या खोल्यांना प्रशासनाने सील ठोकले आहे. गुरुमीत रामरहीम हा सध्या रोहतक कारागृहात बंद असून, त्याच्या समर्थकांनी हिंसक होऊ नये म्हणून छापेमारीदरम्यान डेर्‍याभोवती निमलष्करी व लष्करी जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

प्रशासनाची संयुक्त कारवाई मोहीम
दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी गुरुमीत रामरहीम सिंग हा तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या डेर्‍यात पहिल्यांदाच पोलिस यंत्रणा व प्रशासकीय अधिकारी घुसले आहेत. त्यांनी व्यापक शोधमोहीम हाती घेतली असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होत आहे. या छापेसत्राबद्दल माहिती महासंचलनालयाचे उपसंचालक सतीश मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले, की महसूल व पोलिस प्रशासनाच्यावतीने हे छापे घालण्यात आलेले आहेत. महत्वाची माहिती असलेल्या काही हार्डडिस्क, लक्झरी गाड्या आणि संशयास्पद औषधी जप्त करण्यात आली आहे. तसेच, अद्यापही छापेसत्र सुरुच आहे. या माहिमेत विविध शासकीय विभागाचे अधिकारीही सामिल झाले होते. लक्झरी कारसह काही ओबी व्हॅन, बंद करण्यात आलेल्या मूल्याच्या सात हजार नोटा, काही रोकड आणि लेबल व ब्रॅण्ड नसलेली औषधी हस्तगत करण्यात आलेली आहे. कर्नाल आणि सोनपत येथून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून, तेही तपास करत आहेत, असे मिश्रा म्हणाले.

बाबांच्या गुहेपर्यंत तपास पथक पोहोचले!
पहिल्या दिवशी सलग दहा तांस शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिस व महसूल पथक गुरुमीतच्या गुहेपर्यंत पोहोचले होते. तेथे त्यांना पाचजण आढळले. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच, एक वॉकीटॉकी संचही आढळून आला. तीन सीसीटीव्ही कॅमेरेही जप्त करण्यात आले असून, डेरे अनेक दुर्मीळ वन्य प्राणीही आढळून आले असून, आतमध्ये भुयार असल्याने खोदकामासाठी एक जेसीबीही मागविण्यात आली होती. या संपूर्ण शोधमोहीमेचे व्हिडिओ चित्रिकरण केले जात होते. सापडलेल्या दोन अल्पवयीन मुलांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते.

सिरसात संचारबंदी लागू
डेरा सच्चा सौदामध्ये गुरुमीत रामरहीम सिंगने स्वतःचे चलन अस्तित्वात आणल्याचाही पुरावा मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक नाणे मिळून आले असून, त्याबद्दल तपासयंत्रणा चौकशी करत होती. शुक्रवारी सकाळी आठ वाजता या छापेमारीस सुरुवात झाली. या संपूर्ण मोहिमेवर निगरानी ठेवण्यासाठी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती ए. के. एस. पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात पोलिस, महसूल प्रशासन आणि इतर विभागाच्या अधिकार्‍यांनी डेर्‍यात तपासणी मोहीम सुरु केली होती. कोणताची अनुचित प्रकार घडू नये यासाठी डेरा मुख्यालय परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच, लष्करी व निमलष्करी जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदीही करण्यात आली होती. या शोधमोहिमेचा स्वतंत्र अहवाल उच्च न्यायालयात दाखल केला जाणार आहे.