नवी दिल्ली। केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई वाहतूक संपर्क योजनेनुसार विमानतळांची सुविधा असूनही ती कार्यान्वीत नसलेल्या 31 शहरांना विमानसेवेने जोडण्याची घोषणा झाली आहे. 128 शहरे या घोषणेमुळे विमानसेवेने जोडली जाणार असून त्यात जळगावचा समावेश आहे. एप्रिल ते सप्टेबर दरम्यान या 128 मार्गांवर 19 ते 78 आसनक्षमतेची विमाने धावण्यास सुरूवात होईल. टुर्बो प्रॉप्स प्रकारातील ही विमाने स्पाईस जेट, एअरइंडिया, प्लस एअरडेक्कन, एअर ओडीशा व टुर्बो मेगा या पाच विमान कंपन्यांकडून चालविली जातील. जळगावात एअर डेक्कन कंपनीची सेवा उपलब्ध होणार आहे. प्रति तास 2500 रूपये भाडे आकारणी होणार असली तरी सेवेतील तूट भरून काढण्यासाठी 50 रु.अतिरीक्त आकारण्याची मुभा विमान कंपन्यांना आहे. त्यामुळे 6 लाख 50 हजार वाहतुकीच्या प्रवाशीतून 205 कोटी रूपये विमान कंपन्यांना उभे करता येतील, असे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. या नव्या योजनेत दिल्ली शहर भटींडा, कुलू, शिमला, आग्रा, पठाणकोट, पंतनगर, लुधीयाना, बिकानेर; जयपूर शहर आग्रा, जैसलमेर ; शिलाँग शहर अगरताळा ,ऐजवाल दिमापूर, इंफाळ, सिल्चर ; कोलकाता शहर बूरनपूर, कुचविहार, दुर्गापूर, जमशेदपूर, रूरकेला ; पॉण्डीचेरी शहर हैदराबाद, सालेम, चेन्नई ; मुंबई शहर कांडला, पोरबंदर, जळगाव, नाशिक, सोलापूर व अहमदाबाद शहर दिव, द्वारका, जामनगर, मुंद्रा या छोट्या विमानतळाशी जोडले जाणार आहे.
फेबु्रवारीत ‘उडाण समिती’ची पाहणी
सामंजस्य करार झाल्यानंतर 27 फेब्रुवारी 2017 रोजी जळगाव विमानतळावरून स्थानिक उड्डाणांची सुविधा सुरू करण्यासंदर्भात आवश्यक त्या पूर्ततांची तपासणी करण्यासाठी स्थानिक संपर्क अभियान अर्थात ‘उडान’ अभियानाअंतर्गत संयुक्त समितीने जळगाव येथील विमानतळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा हे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. या समितीत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणासह विविध खात्यांचे अधिकार्यांचा समावेश होता. यावेळी समितीने जळगाव विमानतळ येथील सर्व पायाभूत सुविधांची पाहणी केली. विमानतळावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक आगमन व प्रस्थानाच्या वेळी लागणारी सुरक्षा व्यवस्था (लगेज तपासणी इ.), मुलभूत सुविधांची उपलब्धता याबाबींसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर विमानाचे आगमन व उड्डाण यासंदर्भात धावपट्टीची तांत्रिक क्षमता, विमाने थांबविण्याची व्यवस्था, विमानसेवा देणार्या कर्मचार्यांसाठी असणार्या सुविधांबाबत तपासणी केली. यानंतर हा अहवाल केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात आला. तेथे विमानसेवा देणार्या संस्थांपुढे या अहवालाचे सादरीकरण करून नंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार सुविधांची उभारणी करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यात येतील, असे समितीतर्फे सांगण्यात आले होते. यानुसार आता जळगावच्या
विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
18 ते 78 आसनांची विमाने
केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार जळगावसह अन्य विमानतळांवरून हवाई वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी 18 ते 78 आसनक्षमता असणारी विमाने वापरण्यात येणार आहेत. यासाठी एयर इंडिया, स्पाईस जेट, डेक्कन एयर, अलायन्स एयर, एयर ओदिशा व टर्बो मेधा या कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. यासाठी सरकारने एक तासांच्या आत अंतरावरील हवाई वाहतुकीसाठी किमान 2500 रूपये प्रतिव्यक्ती तिकिट द्यावे असे सुचीत केले आहे. जळगावहून पहिल्या टप्प्यात मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर लक्षात घेता जळगाव ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रूपयात होऊ शकतो.
गतवर्षी झाला सामंजस्य करार ः जळगाव येथील विमानतळ पूर्ण होऊनदेखील येथे प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी विलंब होत होता. जवळपास पाच वर्षांपासून ही बाब रखडली होती. या पार्श्वभूमिवर 22 ऑगस्ट 2016 रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जळगाव विमानतळाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रादेशिक जोड योजनेसाठी राज्य सरकारचा केंद्र शासनाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने दुसर्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट 2016 रोजी संबंधीत करार करण्यात आला. या माध्यमातून जळगावसह शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 10 शहरातील विमानतळांचा समावेश करण्याची
खुशखबर…जळगावकरही बुंऽऽऽग उडणार
शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणात देशातील वेगवेगळे प्रदेश विमानसेवेने जोडण्यासाठी आर्थिक मदत देण्यासह त्यासाठी आवश्यक असणार्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने या धोरणांतर्गत प्रादेशिक जोड योजना (रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम) प्रस्तावित केली आहे. यानुसार जळगाव विमानतळाच्या विकासाची शिफारस करण्यात आल्यामुळे विमानसेवा सुरू होण्याला गती मिळाली.
विमानतळाच्या निर्मितीतही अडचणी
जळगाव येथील विमानतळ पूर्णत्वाकडे येण्यासाठी तब्बल चार दशकांचा वेळ लागला होता. 1971 मध्ये तत्कालीन मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते जळगाव शहराजवळ विमानतळाचे भूमिपूजन झाले. 1973 मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी विमानतळाचे उदघाटन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित व देखभालीसाठी असणार्या या विमानतळावर शासकीय खाजगी विमाने नियमितपणे उतरत होती. मात्र येथून खासगी विमानसेवा सुरू व्हावी या हेतूने जळगाव नगरपालिकेने विमानतळ आपल्या ताब्यात मिळावे म्हणून ठराव केला. नगरपालिकेने त्यासाठी मोठी धावपट्टी करण्याचा निर्णयही घेतला. प्रत्यक्षात मात्र हे काम रखडले. यामुळे विमानतळ परत सुरू व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांच्या पुढाकाराने महापालिकेकडून हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला 23 एप्रिल 2007 रोजी हस्तांतरित करण्यात आले. यानंतरही विमानतळाचे काम सुरू होईना. अखेर सौ. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांनी विमानतळाचे काम सुरू झाले. प्रतिभाताईंच्या हस्ते 13 जून 2010 रोजी विमानतळाचे भुमिपुजन झाले. यानंतर विमानतळाचे काम युध्द पातळीवर करण्यात आले. अखेर 23 मार्च 2012 रोजी सौ. प्रतिभाताईंच्याच हस्ते जळगाव विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले.
उद्योग, पर्यटनासाठीही महत्वाची सेवा
जळगावातून विमानसेवा सुरू होण्याने खूप वर्षांपासूनची गरज पूर्ण होत आहे. सुरूवात छोट्या विमानांनी होणार असली तरी पुढे सेवा विकसीत होऊ शकते. जळगावची धावपट्टी 45 आसनी विमाने उतरू शकतील एवढी असली तरी पुढे ती वाढवता येईल. विमानसेवा सुरू होण्याचा नक्कीच जळगावला फायदा होईल. सध्या विदेशी लोकांना औरंगाबादच्या विमानतळावर उतरून जळगावला यावे लागते किंवा येथून औरंगाबादला जावे लागते. त्यासाठीचे त्यांचे जाणे येण्याचे 6 तास वाचतील. पर्यटक जळगावात आधी गांधीतीर्थ, अजिंठालेणी, वेरूळलेणी पाहून औरंगाबादला जावू शकतील. किंवा मुंबईहून औरंगाबादेत उतरल्यावर अजिंठा, वेरूळ, गांधीतीर्थ पाहून जळगावहून मुंबईला जावू शकतील. कारखाने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे जिल्ह्यातील जे लोक मुंबई, पुणे, बंगळूरू येथे व विदेशातही आहेत त्यांचीही मोठी सोय होईल. भविष्यात जळगावात माहिती तंत्रज्ञानातील मोठी कंपनी येऊ शकते.
अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समहू
दळणवळणाचा फायदा उद्योगवाढीला होतच असतो. विमानसेवेने जळगावची उद्योगाची मोठी गरज पूर्ण होईल. येथील उद्योजकांचा वेळ व खर्च वाचेल. व्यवसाय वाढवता येईल. जळगावात मोठ्या प्रमाणावर शेती आघाडी उद्योग आहेत. त्यांनाही या विमानसेवेचा फायदा होईल. येथून विमानसेवा सुरू होणे महत्वाचे आहे. पुढे मागणीप्रमाणे ती विकसित करता येईल. सध्याच्या काळात रेल्वेचे उच्चश्रेणीतील भाडे आणि विमानाचे भाडे जवळपास सारखेच आहे. त्यामुळे उद्योजकांचा वेळ वाचणे सर्वात महत्वाचे आहे.
शाम अग्रवाल, उद्योजक
अपेक्षापूर्तीच्या दिशेने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याला आता सर्वत्र सुरूवात झाली आहे. जळगावातील विमानसेवा सुरू होण्यातून जळगावकरांनाही त्याचा प्रत्यय आलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या धोरणानुसार राज्यभर या गोष्टीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसतील. जळगाव शहरात विमानसेवेमुळे उद्योगांना नक्कीच फायदा होईल.
आ.राजूमामा भोळे