मुंबई : नोटाबंदीच्या घोषणेनंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेल्या सर्व मर्यादा १३ मार्चपासून मागे घेतल्या जातील आणि खातेदार हवे तेवढे पैसे काढू शकतील. तत्पूर्वी, बचत खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपयेच काढण्याची मर्यादा २० फेब्रुवारीपासून ५० हजार रुपये केली जाणार असल्याचे आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आज जाहीर केल्यामुळे देशवासियांना दिलासा मिळाला आहे.
दोन टप्प्यांमध्ये उठतील निर्बंध
बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा काही प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून ५०,००० रूपये काढता येतील. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल. त्यानंतर १३ मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.
तीन महिन्यानंतर दिलासा
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात अभूतपूर्व चलनटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. चलनटंचाईमुळे बँक आणि एटीएम केंद्रातून रक्कम काढण्यावरही रिझर्व्ह बँकेकडून अनेक निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही काळात हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आले होते. मात्र, तरीही काही निर्बंध अजूनही कायम होते. आता मात्र तब्बल तीन महिन्यानंतर जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नवीन नोटांची ‘कॉपी’ अशक्य
दरम्यान, २७ जानेवारीपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण ९.९२ लाख कोटी रूपये मुल्याच्या ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याची माहितीही यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली. या नोटांची हुबेहूब कॉपी करणं, त्याच्या बनावट नोटा बनवणं अत्यंत कठीण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.