खुशाल बोला; कॉल रेट कमी होणार!

0

नवी दिल्ली : मोबाईल वापरणार्‍या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. टेलिकॉम नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने कंपन्यांचे इंटरकनेक्टिंग दर कमी केले आहेत. याचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. ट्रायने घेतलेल्या निर्णयाचा फायदा मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना दिल्यास मोबाईल कॉल रेट कमी होणार आहेत. मोबाईलच्या जगात दिवसेंदिवस क्रांती होत आहे. टेलिकॉम कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे बिलात आधीच थोडी घट झाली आहे. शिवाय, आता ट्रायने कंपन्यांचे इंटरकनेक्टिंग दर कमी केल्याने मोबाईलची बिले आणखी कमी होणार आहेत.

मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने इंटरकनेक्ट युजर चार्जेस (आययुसी) चा दर 14 पैसे प्रति मिनिट वरून 6 पैसे प्रति मिनिट केला आहे. दर कपातीमुळे मोबाईल ग्राहकांना लाभ होणार आहे, असे ट्रायच्या पत्रकात म्हटले आहे. नवीन दर ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहेत. मोबाईल कंपन्यांना एकमेकांना फोनच्या कनेक्टिंग कॉल्ससाठी द्याव्या लागणार्‍या पैशात कपात करण्यात आल्याने ग्राहकांना कमी दरात कॉल सेवा उपलब्ध होणार आहे. 2020 पर्यंत हे दर शून्य रुपये करण्यात येणार आहेत. ट्रायच्या या निर्णयाला भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांनी विरोध केला आहे. इंटरकनेक्ट युजर चार्जेस कमी करण्याऐवजी वाढवण्याची मागणी या कंपन्यांनी केली होती. रिलायन्स जिओने स्वस्त दरात इंटरनेट सेवा आणि लाईफटाईम मोफत कॉल सेवा दिल्याने या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. जिओने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून लाइफटाइम मोफत व्हॉइस कॉलिंग आणि कमी दरातला डेटा प्लान दिला आहे. लवकरच जिओ नवे स्वस्त टॅरिफ दर घोषित करणार आहे. परिणामी या नव्या इंटरकनेक्ट युजर चार्जेसच्या विरोधात मोबाइल कंपन्यांनी ट्रायचे दरवाजे ठोठावले आहेत.