धरणगाव । धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथील बारकु भादु पाटील याला विष पाजुन त्याचा खुन केल्या प्रकरणी बारकुचा काका जगन्नाथ एकनाथ पाटील, काकु लताबाई जगन्नाथ पाटील, चुलतभाऊ राजेंद्र जगन्नाथ पाटील सर्व राहणार बोरगाव बु, तसेच बारकुचे आतेभाऊ माधव प्रल्हाद पाटील व भुरा प्रल्हाद पाटील या पाच संशयित आरोपींची जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश कविता अग्रवाल यांनी निर्दोष मुक्तता केली. 7 फेब्रुवारी रोजी बारकु हा नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पाचही संशयितांनी विषपाजून बारकु पाटील यांचा खून केला होता. याप्रकरणी मयत बारकुची आई सुमनबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला व सर्व संशयितांना अटक अटक करण्यात आली
होती.
यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
खटला न्यायालयात सुरू झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मयत बारकुची आई फिर्यादी सुमनबाई भादु पाटील, धनराज गैंदल पाटील व मनोहर धनराज पाटील दोघेे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आनंदा सिताराम मराठे व अरुण तुकाराम पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण जाधव व तपासाधिकारी पोलिस निरिक्षक योगेश मोरे यांचेसह अन्य एकुण सात साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. यानंतर साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, अविश्वासार्हता व तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या बचावाचे काम अॅड. वसंत. आर ढाके, व अॅड. भारती ढाके यांनी पाहिले. सरकारतर्फे अॅड. एस.जी.काबरा यांनी काम पाहिले.