खूनातील संशयितांचे कार सोडून पलायन

0

जळगाव । शेगाव येथे जायचे आहे असे कारण सांगून औरंगाबाद येथुन भाडयाने घेतलेल्या कारचालकाचा सिल्लोड ग्रामीण हददीत पालोद फाटानजिक धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह फेकून देत त्याच कारमधुन पसार झालेले हल्लेखोर गुरूवारी रात्री जळगावमध्ये दाखल झाले. नंतर ही कार नेहरूपुळ्याजवळ पगारिया बजाज शोरूमसमोर पार्किंग करून संशयीतांनी पोबारा केला. दरम्यान सिल्लेाड पोलीसांनी शोधमोहिम राबवुन जळगाव शहर गाठुन ही कार तसेच कारमधील रक्ताने माखलेले कपडे पोलीसांनी हस्तगत केले. शेख शकील शेख शब्बीर (32) असे मयत चालकाचे नाव आहे.

घटनेचा सविस्तर तपशिल
शेख शकील हा मुळ मालेगाव (औरंगाबाद) येथील रहिवासी असून तो इम्रानखान समुंदरखान यांच्या मालकीची क्रूझर क्रमांक एम.एच. 20 ई.ई. 3481 वर चालक म्हणून कार्यरत होता. गुरूवार दि.13 रोजी औरंगाबाद येथे एका व्यक्तीने शेख शकील यांची भेट घेऊन शेगाव येथे जावयाचे असल्याने गाडी भाडयाने हवी, असे सांगीतले. चालकाने ही वर्दी मान्य केल्यानंतर एक व्यक्तीस गाडीत बसवुन चालक मार्गस्थ झाला. तर आणखी दोन सहकारी सिल्लोड येथुन बसणार असल्याने त्याठिकाणी कार थांबविण्याची सुचना चालकास केली. दरम्यान दोघांना कारमध्ये बसविल्यानंतर कार पुढच्या मार्गाला निघाली असताना पोलाद फाटयावरील पेट्रोंलपंपाजवळ चालक शेख शकील याच्यावर धारदार शस्त्राने वार करून चालकास महामार्गाच्या बाजूला त्यास फेकुन संशयीत हीच कार घेऊन पसार झाले. दरम्यान जखमी अवस्थेतील शेख शकील याने रात्री 01.22 वाजेच्या सुमारास गाडी मालक इम्रानखान यांना फोन करून आपल्यावर चाकू हल्ला झाला असून तुम्ही लवकर या, अशी माहिती मोबाईलवरून दिली. नंतर इम्रानखान यांनी या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीसांना दिली. रात्री गस्तीवरील पथकाने घटनास्थळी धाव घेत चालकास रूग्णालयात हलविले.