जळगाव । चाळीसगाव येथे प्रियकराच्या मदतीने पत्नी आणि एका साथीदाराने 6 जानेवारी 2016 रोजी पतीचा खून केला होता. या प्रकरणी चाळीसागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यातील एका संशयिताने अतिरीक्त सत्र न्यायायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज बुधवारी फेटाळला आहे. चाळीसागाव येथील इकरार खान इक्राम खान (वय 35) यांचा 6 जानेवारी 2016 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी आसमा इकरार खान (वय 30) हिने तिचा प्रियकर राज उर्फ शानू नसरुद्दीन खान (रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) आणि त्याचा भाऊ राजू नसरूद्दीन खान याच्या मदतीने खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यात आसमा खानही जामीनावर आहे. तर राज याने न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज बुधवारी फेटाळला आहे. सरकारतर्फे अॅड. नितीन देवराज यांनी कामकाज पाहिले.