धुळे । नागपूर सुरत महामार्गावरील वार-कुंडाणे शिवारात पार्टी करतांनाच मित्राला गोळी घालून ठार मारल्याची घटना गेल्या सोमवारी रात्री घडली होती. या खून प्रकरणातील पिस्तूल अखेर साक्रीरोडवरील एका विहीरीतून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. दीपक दगडू वाघ (वय 28, रा.कुंडाणे वार ता.धुळे) हा सेामवारी रात्री त्याचे मित्र अभय दिलीप अमृतसागर (कुंडाणे ता.धुळे), पंकज परशुराम जिसेजा, (रा.मोगलाई धुळे), भांग्या उर्फ नाना उर्फ मुरलीधर अमृतसागर, (रा.रेल्वेस्टेशन धुळे), पंकज उर्फ भुर्या जीवन बागले (रा.रमाईनगर धुळे), गोटू दगडसिंग पावरा (रा.कंडाणे) यांच्यासोबत कुंडाणे शिवारात पुनर्वसित पडीत घराजवळ पार्टी करण्यासाठी गेले होता. यावेळी मित्रांनी बंदूकीतून गोळी मारुन दीपकचा खून केला होता. यानंतर भांग्या उर्फ नाना उर्फ मुरलीधर अमृतसागर याने ती बंदूक विहीरीत फेकून दिली होती. पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी आरोपींकडून माहिती घेवून गुन्ह्यात वापरलेल्या त्या बंदूकीचा शोध घेतला. आज सकाळी महापालिकेचे व जिल्हा प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच एसआरपीचे कर्मचारी यांच्या मदतीने साक्रीरोडवरील नवजीवन इंग्लिश स्कूलजवळ असलेल्या एका विहिरीत शोध मोहिम राबविण्यात आली. एका काठीला लोहचुंबक (मॅग्नेट) बांधून ती काठी विहीरीत सोडण्यात आली. अथक प्रयत्नानंतर ही बंदूक चुंबकाला चिकटून वर आली. त्यानंतर ती बंदूक जप्त करण्यात आली आहे.