जळगाव । जिल्हा आज खून, अपघात, आत्महत्यांच्या घटनांनी हादरला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा मुद्दा पुन्हा संतापाचे कारण ठरला आहे तर अल्पभूधारक शेतकर्याच्या आत्महत्येने सर्वांना चिंतेत टाकले. चाळीसगाव तालुक्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह जाळल्यानंतर अवशेषाच्या रुपात आढळल्याने वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांपुढे उभे केलेले आव्हानही अधोरेखित झाले. शेतवस्तीवर राहणार्या 75 वर्षिय वृद्धेचा बळी फक्त 12 हजार रुपयांच्या दागिण्यांसाठी चोरट्यांनी घेतल्याने चोपडा तालुक्यात पोलीस पुन्हा एकदा लोकांच्या संतापाचा मुद्दा ठरले आहेत.
शेतकर्याची आत्महत्या
चोपडा । तालुक्यातील सुटकार येथिल सुरेश केशव ठाकरे (55) या शेतकर्याने गळफास घेऊन जीवनयात्रा आज संपवली. अडावद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तापी काठावर वसलेल्या सुटकार येथील सुरेश केशव ठाकरे (55) हे सकाळी शेतात कामासाठी आले होते मात्र त्यांनी त्यांच्या शेतातील वायकरणच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे मात्र सुरेश ठाकरे यांचे गावातील काही लोकांशी वाद सुरू होते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खुन करून त्यांना झाडावर लटकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे त्यांच्यावर खाजगी अथवा इतर कर्ज होते का हे समजु शकले नाही. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पवार यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. पोलिसपाटील ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या खबरीवरुन अडावद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तपास पोहेकाँ संतोष पारधी करीत आहे.
वरणगाव फॅक्टरी गेटजवळच्या अपघातात आई दगावली, मुलगा जखमी
वरणगाव । राष्ट्रीय महामार्गावरील ऑर्डनन्स फॅक्टरी गेटजवळ मुक्ताईनगरकडे जाणार्या मोटरसायकलला पाठीमागच्या ट्रकने धडक दिल्याने सम्राटनगरमधील रहिवाशी महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राटनगरमधील रहिवाशी शेख अफसर शेख इसमाईल त्याची आई हमीदाबी शेख (वय 55) यांना मोटरसायकल (क्र. एम एच 19 एक्स 6971)वर मुक्ताईनगरला दवाखान्यात घेऊन जात असताना ऑर्डनन्स फॅक्टरी गेटजवळ भरधाव ट्रक (क्र. एम एच 34 सी एम 90 28)चा चालक दीपक लक्ष्मण नारायणकोंडा (वय 30, रा- चंद्रपूर) यांने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत हमीदाबी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेख अफसर जखमी झाला. त्याच्यावर वरणगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळावरून चालक ट्रकसह फरार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेवून वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख अफसरच्या फिर्यादीवरुन वरणगांव पोलिसात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दिलीप गागुर्डे, पीएसआय निलेश वाघ, पोहेकॉ सुनील वाणी, योगेश येवले, मजहर पठाण करीत आहेत.
सायगावात तरुणाची आत्महत्या
चाळीसगाव । तालुक्यातील सायगाव येथील रहीवाशी बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. काशिनाथ (बबन आबा) बुधा पाटील यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष भुषण पाटील यांचे बंधु चेतन काशिनाथ पाटील (25) याने दि. 20 फेब्रुवारी 2017 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्याकेल्याची घटना उघडकीस आली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन पाटील याचा मृतदेह 20 रोजी गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला त्याने गळफास का घेतला ? याबाबत समजू शकले नाही. चेतन पाटील हा अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचा असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच चाळीसगाव तालुक्यात पार पडलेल्या जि.प.च्या निवडणूका झाल्या त्यात सायगाव – उंबरखेड गटातून त्यांचे मोठे बंधु भुषण पाटील यांनी निवडणूक लढविली आहे. दि. 20 रोजी सायगाव ता. चाळीसगाव सायगावात तरुणाची आत्महत्या येथे मृत चेतन वर दुपारी 4 वाजेच्यासुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी, राजकीय, शैक्षणिक,सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
भोरस रस्त्यावर तरूणाचा जळालेला मृतदेह
चाळीसगाव । 17 ते 22 वर्षीय अज्ञात तरूणाचा जळालेल्या स्थितीत मृतदेह तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना ते भोरस रोडवरील शेताच्या बाजुला दि. 20 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10:15 वाजेपुर्वी मिळून आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मयताच्या डोळ्याच्यावर जखमेचे निशाण असल्याने त्याचा घातपात करून भोरस रस्त्यावर तरूणाचा जळालेला मृतदेह जाळण्यात आले असावे असा संशय सुत्रांनी वर्तविला असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना ते भोरस रस्त्यावरील विठ्ठल नामदेव पाटील यांच्या शेताच्या 200 फुटाच्या अंतरावर रोडलगत एका अनोळखी 17 ते 22 वयोगटातील तरूणाचा मृतदेह जळालेल्या स्थितीत मिळून आला आहे. सदर तरूण कोण ? तो राहणार कुठला? त्याचप्रमाणे त्याचा मृतदेह त्याठिकाणी जळालेल्या हे प्रश्न अनुतरीत आहेत.
75 वर्षीय वृध्देची हत्या
चोपडा । चोपडा व अडावद या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुळ नदीच्या परिसरातील रुखणखेडा शिवारात प्रविण निकम यांच्या शेतात राहणार्या 75 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गालगतच्या स्टोन क्रशरवर सुपरवायझर म्हणून कडू कोळी कामावर होते रुखणखेडा शिवारातील 75 वर्षीय वृध्देची हत्या
प्रविण निकम यांच्या शेतावर असलेल्या घरात कडू कोळी व त्यांच्या वृद्ध आई राहत होते भुलाबाई कोळी ही वृद्ध महिला घरात एकटी असताना अज्ञात इसमाने या महिलेच्या तोंडावर, कपाळावर , कानावर, हातावर जबर दुखापत करून कानातील दोन ग्रॅमच्या बाह्या व इतर सोने असा एकुण 12 हजार रुपये किंमतीच्या ऐवज चोरून नेला ही घटना काल सायंकाळी घडली असावी वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालेला होता कडू कोळी ( रा. नायगांव ता. यावल, ह. मु. प्रविण पाटील यांच्या शेतात) यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला तपास पो.नि. नजन पाटील करीत आहे.
शिक्षिकेवर बलात्कार
भुसावळ । येथील रहिवासी तसेच फैजपूर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यान्वित असलेल्या शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला व अन्य आरोपींनी शिवीगाळ केल्याने सोमवार 20 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणीच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी चेतन नारायण भंगाळे (वय 31, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ), त्याचे वडील नारायण भंगाळे, आई शोभा भंगाळे, ललिता कैलास कुरकुरे व मेहुणे कैलास कुरकुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ आरोपी चेतनने अनेकदा तरुणीवर ठिकठिकाणी अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला तर अन्य आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे़ बलात्कारासह अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहे.
भुसावळात जबरी लूट, एकाविरुद्ध गुन्हा
भुसावळ- भंगाराच्या लोटगाडीवर येवून बळजबरीने खिशातील एक हजार रुपये रोख लूटत लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आल्याची तक्रार अलीखान शब्बीर खान (पापा नगर, भुसावळ) यांनी दिल्यावरून संशयीत आरोपी जावेद शहा उर्फ काल्या (पूर्ण नाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ 20 रोजी सकाळी दहा वाजता ही घटना घडली़ पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काझी करीत आहे.