भुसावळ । खून व गोळीबार प्रकरणातील तिघा संशयीतांना गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या विशेष ईआरटी पथकाने ही कारवाई केली. माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, किशोर उर्फ गोजोर्या जाधव, जय मुकेश ठाकूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुप्त माहितीवरून विशेष पथकाची कारवाई
शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयर प्राईडमध्ये तीनही संशयीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. भुसावळ नगरपालिकेतील पुणे येथील ठेकेदाराने स्वच्छतेचा ठेका घेतला असून त्यास कामगारांची आवश्यकता असल्याने ती पुरवण्याची हमी संतोष बारसेने घेतली होती व त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी खोली क्रमांक तीन बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी खोलीत असतानाच विशेष पथकाने झडप टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या. अंग झडतीत बारसेकडे गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुस आढळले.
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ईआरटी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र साळुखे, पोलीस नाईक बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहील तडवी, इशत्याक सैय्यद, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दिपक जाधव, प्रदिप इंगळे, सोपान पाटील यांनी कारवाई केली. याबाबत चौकशी केली जात असून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे.