खूशखबर! लवकरच 5-जीही येणार!

0

नवी दिल्ली : भारतात झपाट्याने झालेल्या मोबाईल फोन्सच्या क्रांतीमुळे लोकांचे जगणे सुसह्य झाले आहे. सध्याचा फोर-जीचा जमाना असला तरी, आता हे तंत्रज्ञान आणखी वेगवान होणार असून, 2020 पर्यंत देशात 5-जी सेवा सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात एका समितीची स्थापना केल्याची मंगळवारी घोषणा केली. ही समिती या नव्या तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करणार आहे.

500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, या नव्या तंत्रज्ञानाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी आम्ही 5-जी समितीची निर्मिती केली आहे. जेव्हा जगात 2020 मध्ये हे तंत्रज्ञान सुरु होईल. तेव्हा भारत त्यात आघाडीवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दूरसंचार विभागातील अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, 5-जी तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी केंद्र सरकार 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानांतर्गत सरकारने शहरी भागात 10 हजार एमबीपीएस या वेगाने डेटा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर ग्रामीण भागात 1 हजार एमबीपीएस वेगाने डेटा पुरवण्यात येणार आहे. या सेवेच्या या समितीत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दूरसंचार विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सचिवांचा समावेश असणार आहे.