खूषखबर…मॉन्सून लवकरच अंदमानात

0

पुणे : गेले तीन महिने कडक उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा देणारी घोषणा हवामान विभागाने केली आहे. नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान द्वीपसमुहात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत असून, 15 मेच्या सुमारास हे वारे अंदमान द्वीपसमुहात दाखल होतील, असे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे देशभऱातील बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

भारतीय उपखंडात नैऋत्य मोसमी वार्‍यांमुळेच प्रामुख्याने पाऊस होतो. त्यावरच उपखंडाचे जीवनमान व अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या पावसाकडे शेतकरीवर्गासह सर्वांचेच लक्ष लागलेले असते. मोसमी पाऊस कसा होणार, त्याचे प्रमाण किती असेल, हे जाणून घेण्यात म्हणूनच सर्वांना रस असतो.

वेळेपूर्वीच दाखल होण्याची चिन्हे
दरवर्षी सर्वसाधारणपणे 20 ते 25 मेच्या सुमारास अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत ते करळमध्ये व पुढे आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्रात दाखल होतात. यंदा नैऋत्य मोसमी पावसास पूरक व पोषक असे वातावरण आधीच तयार होत असल्याने हा पाऊस सुमारे आठ ते दहा दिवस आधीत अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याची चिन्हे आहेत. या पूरक स्थितीमुळे ोसमी पाऊस 15 मेच्या सुमारास अंदमानचा दक्षिण भाग व निकोबार बेटांत दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

खरीपाच्या कामांना होणार प्रारंभ
यंदा फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच उन्हाळा तीव्र बनत गेला. मार्चमध्येच देशभऱात उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे यंदा मोसमी पावसाला लवकर सुरवात होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हवामान विभागाने त्यास बुधवारी पुष्टी दिली आहे. साहजिकच त्यामुळे देशभऱातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष या पावसाकडे राहणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे देशात खरीपाच्या हंगामाच्या तयारीला वेग येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दक्षिणेत पडणार अवकाळी
दरम्यान, देशभऱात व विशेषतः पूर्व व ईशान्य भारतात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यांसह मॉन्सूनपूर्व सरी बरसत आहेत. पुढील आठवडाभर हा पाऊस कायम राहील. तसेच, तमिळनाडू आणि कर्नाटकातही येत्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

वर्ध्यात सर्वाधिक तापमान
राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 44 अंश तापमान वर्ध्यात नोंदवले हेले. त्यापाठोपाठ जळगावमध्ये 43.5 अंश तापमान नोंदवले गेले. विदर्भात बहुसंख्या ठिकाणी पारा 42 अंशांच्या वरच होता. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील तापमान पुढील किमान आठवडाभर असेच राहील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मध्य व दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कोकणपट्टी आणि मुंबई परिसरात पुढील काही दिवस दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच, मराठवाड्यासह काही ठिकाण अवकाळी पाऊस होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे परिसरात ढगाळ हवामान
पुणे परिसरात गेले काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले आहे. पुढील किमान आठवडाभर असेच हवामान राहील, असेही वेधशाळेतून सांगण्यात आले. शहरात बुधवारी 39.3 अंश तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवस उन्हाचा कडाका जाणवणार असल्याचेही सांगण्यात आले.