खूषखबर! यंदा समाधानकारक पाऊस

0

नवी दिल्ली : देशात यंदा नैऋत्य मॉन्सूनचे प्रमाण सरासरी असेल. देशाच्या सर्व भागांत पावसाचे प्रमाण चांगले राहील. यंदाच्या पावसावर एल निनोचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असा प्रथामिक अंदाज हवामान कात्याने मंगळवारी व्यक्त केला. यामुळे राज्यातील व देशातील शेतकर्‍यांना व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याचे संचालक के. जे. रमेश यांनी येथे पत्रकार परिषदेत मॉन्सूनबाबतचा पहिला अंदाज व्यक्त केला. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील शेती, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मॉन्सून हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच पावसाचे प्रमाण कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

एल निनोचा परिणाम नाही
जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमधून मॉन्सून देशात प्रवेश करतो आणि हळूहळू देशभर व्यापून शेवटी सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून माघारी जातो. एल निनोचा परिणाम अद्याप काही प्रमाणात जाणवत असला, तरी त्याची परिणामकारकता कमी करणारा इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) हा घटक यावेळी कार्यरत असेल. त्यामुळे यंदा देशभरात सरासरीएवढी पाऊस पडेल, असे रमेश यांनी सांगितले.

जूनच्या प्रारंभीही अंदाज
गेल्या 50 वर्षांतील मॉन्सूनची आकडेवारी विचारात घेता यंदा किमान 96 टक्के ते कमाल 104 टक्क्यांदरम्यान पर्जन्यमान राहील, असे रमेश यांनी सांगितले. हे प्रमाण सरासरीएवढे मानले जाते. गेल्या वर्षी हवामान खात्याने सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यावेळी 97 टक्केच पाऊस झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा मॉन्सूनबद्दलचे अंदाज जाहीर केले जातील, असेही रमेश यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियासह काही देशांनी प्रशांत महासागरात एल निनोच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती दिसून आल्याचे म्हटले होते. भारतीय हवामान खात्याने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. यंदा देशात मॉन्सूनला सुरूवातीच्या महिन्यांत एल-निनोचा फटका बसणार नाही. मॉन्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात एल-निनो सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

स्कायमेटच्या अंदाजाला पुष्टी
स्कायमेट या खासगी संस्थेनेही देशात यंदा सरसरी 95 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. जुलैनंतर एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर दिसू शकेल, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. मात्र, हवामान खात्याने हा अंदाज फेटाळून लावला आहे.

निळाईचा शुभसंकेत
रत्नागिरीच्या समुद्रकिनार्‍यावर ब्ल्यू बटण जेलीफिशचे आगमन झाले असून, या पाहुण्यांमुळे समुद्र किनारे निळाईने नटले आहेत. हे मासे प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण पट्ट्यात आढळतात. समुद्रातले प्रवाह आणि वार्‍या प्रवाहांनुसारच हे मासे प्रवास करतात. जोरदार समुद्री वारे आणि प्रवाहांबरोबर हे मासे सध्या कोकणच्या किनार्‍यावर आले आहेत. ब्ल्यू बटण जेलीफिश कोकणच्या किनार्‍यांवर येणे हे मॉन्सूनच्या आगमनाचे शुभसंकेत समजले जातात. असे मासे किनार्‍यावर दिसणे, याचा अर्थ यंदा वेळेपूर्वी मॉन्सून दाखल होईल, असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.