खेकड्याचे कवच करणार मलेरियाला अटकाव

0

नवी दिल्ली । खेकड्याचे कवच आणि चांदीच्या सूक्ष्म कणांपासून बनलेल्या स्प्रेमुळे मलेरियाला अटकाव होऊ शकतो, असा दावा चीनमधील संशोधकांनी केला आहे. या स्प्रेमुळे मलेरियाला कारणीभूत ठरणार्‍या डासांचा प्रसार थांबतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा स्प्रे पर्यावरण अनुकूल असून, त्याच्या चाचण्या भारतातच झाल्या आहेत.
नॅशनल तैवान ओशन युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ जियांग शियो हवांग म्हणाले, “थोड्या प्रमाणात हे द्रावण एनोफिलिस सनडाइकस या डासाच्या पैदाशीवर प्रभावी पद्धतीने अंकुश लावण्यासाठी वापरता येऊ शकते. हा डास मलेरियाचा वाहक मानला जातो. मात्र, डासांचे नैसर्गिक शत्रू असलेल्या गोल्ड फिशसारख्या माशांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.” हे संशोधन करणार्‍यांमध्ये तामीळनाडूतील भारतीयार विद्यापीठाचे शास्त्रज्ञही सामील होते.

या शास्त्रज्ञांनी चिटोसान किंवा चिटीन या नैसर्गिक विषारी पदार्थाचा वापर या संशोधनासाठी केला. हा पदार्थ जखमांवरील उपचार आणि जैविक पद्धतीने नष्ट होणार्‍या खाद्यपदार्थांच्या पॅकेजसाठी केला जातो. संधिपाद प्राण्यांचे कवच, पक्ष्यांची चोच किंवा किड्यांचे अंडे यांमध्ये चिटीन हा पदार्थ सापडतो, असे संशोधकांनी सांगितले. याचे रसायनिक स्वरूप सहज बदलता येते. हा अत्यंत प्रभावी आणि निसर्गात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तो किफायतीही आहे. या संशोधकांनी आधी अनेक खेकड्यांच्या कवचाची पूड बनविली, ती वाळवली आणि मग त्यातून चिटीन आणि अन्य खनिज पदार्थ मिळाले. यानंतर त्यांना गाळून मिळालेल्या पांढर्‍या पदार्थासोबत सिल्वर नायट्रेट मिसळण्यात आले. त्यातून चांदीच्या सूक्ष्म कणांचे करडा-पिवळसर द्रावण मिळाले.

लारव्हा प्युपा नष्ट
हे द्रावण कोईम्बतूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डीसीजेजमध्ये पाण्याच्या सहा बांधांवर शिंपडण्यात आले. कमी प्रमाणात वापरूनही या द्रावणामुळे डासांचे लारव्हा आणि प्युपा नष्ट झाल्याचे संशोधकांना आढळले. या संशोधनामुळे लवकरच डासांपासून मुक्ती मिळू शकते.