खेडच्या सहापदरी रस्त्यांसाठी 3615 कोटींचा निधी मंजूर

0

आमदार सुरेश गोरे यांची माहिती

चाकण : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून, हा रस्ता सहापदरी होणार आहे. या रस्त्यासाठी 1799 कोटी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासाठी 950 कोटी व सरलगाव-भीमाशंकर-वाडा-खेड या मार्गासाठी 966 कोटी असा एकूण 3615 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन महामार्गांमुळे दळणवळण सुविधा वाढणार असून त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धरणग्रस्त शेतकर्‍यांना पाठिंबा
भामा आसखेड धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून, दर सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे हे विधान भवन कार्यालयात खास या कामासाठी उपलब्ध राहणार असून पात्र शेतकर्‍यांचे सुयोग्य पुनर्वसन करणार आहेत. येलवाडी गावच्या हद्दीत संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांना सादर केला आहे.

आदिवासींना योजनांचा लाभ नाही
भामचंद्रनगर परिसराचा देहू-आळंदी विकास आराखड्यात समावेश करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्थानिक सत्ताधार्‍यांनी रस्तेविकास, ठाकर वस्त्यांवरील पाणी योजना, आदिवासी समाजातील कुटुंबांना शासकीय योजनांची उपलब्धता यांपासून दूर ठेवले असा आरोप त्यांनी केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पंचायत समितीत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्याने यापुढे विकासकामांची घोडदौड वेगाने होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवाजी वर्पे, प्रकाश वाडेकर, किरण मांजरे, अरुण गिरे लक्ष्मण जाधव, किरण गवारी, विशाल पोतले, बिपिन रासकर, मनोहर गोरे हे उपस्थित होते.

पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा
पत्रकारांनी निर्भीड व निरपेक्ष भावनेने पत्रकारिता करावी तसेच संवेदनशील विषयात बारकावे तपासावेत, जेणेकरून कोणाची प्रतिमा मलीन होणार नाही, अशी अपेक्षा आमदार गोरे यांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 18 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार्‍या धरणे आंदोलनास त्यांनी पाठिंबा जाहीर केला.