भुसावळ- तालुक्यातील खेडी बु.॥ येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. 10 रोजी पहाटे घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. याबाबत प्रतापसिंग जानराव भोळे (43, रा.खेडी बु.॥) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला
भोळे हे परीवारासह घराच्या बेडरूममध्ये झोपले असताना चोरट्यांनी पाठीमागील बाजूने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत प्रवेश केला. हॉलमधील कपाटालाच चाव्या लागल्या असल्याने चोरट्यांना चोरी करणे सोयीचे ठरले. लॉकरमधील 91 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच दहा हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सहा हजार रुपये किंमतीची आठ ग्रॅमची पांचाली, सहा हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅमचे झुमके, 27 हजार रुपये किंमतीच्या दहा ग्रॅमच्या साखळ्या, 27 हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅमची अंगठी तसेच 25 हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅमची सोन्याची चैन लांबवण्यात आली. सुमारे 46 ग्रॅम सोन्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार दिड लाखांच्या घरात असलीतरी पोलिसात मात्र जुन्या किंमतीनुसार ऐवजाची किंमत लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
श्वान घुटमळले, तज्ज्ञांनी घेतले ठसे
चोरीनंतर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड व सहकार्यांनी धाव घेत पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले मात्र श्वान जागीच घुटमळले. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.