पुणे-नाशिक महामार्गावरील साडेनऊ किलोमीटरच्या बाह्यवळण कामाची निविदा मंजूर
खासदार आढळराव पाटील यांनी दिली माहिती
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढते आहे. त्यामुळे वारंवार या वाहतूक कोंडीला स्थानिकांना तसेच वाहनचालकांना सामोरे जावे लागते. यासाठी महामार्गावरील खेड घाट आणि नारायणगाव येथील साडेनऊ किलोमीटरच्या बाह्यवळण कामाची स्वतंत्र व अल्प मुदतीची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध झाली. या कामासाठी 75 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहेत, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, येत्या अडीच ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन खेड घाट आणि नारायणगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट आणि नारायणगाव येथे वारंवार होणार्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले होते. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार खासदार आढळरांवाकडे मागणी होत होती. त्यामुळे या साडेनऊ किलोमीटरच्या बाह्यवळण कामाची कल्पना मांडण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून स्वतंत्र व अल्प मुदतीची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध झाली. या कामासाठी 75 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या नागरिकांना तसेच येथून जाणार्या-येणार्या वाहनचालकांना, खासगी बसचालकांना, एस.टी.ला मोठी कसरत करावी लागत होती. हे काम अडीच ते तीन महिन्यांत पूर्ण होऊन खेड घाट आणि नारायणगावाला जाणार्यांना मार्ग सुलभ होईल.
मागणी केली मान्य
आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या दीडवर्षांपासून खेड-सिन्नर महामार्गावरील पाच बाह्यवळणांची कामे पूर्ण करण्यात ठेकेदाराला अपयश आले होते. त्यामुळे ही कामे मुख्य आराखड्यातून वगळून, त्यांची नव्याने निविदा काढावी, अशी मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली होती. मात्र पाचही बाह्यवळणांची सुमारे 450 ते 500 कोटींची कामे एकत्रपणे निविदाप्रक्रिया राबवून ती सुरू होण्यास विलंब होईल. म्हणून नेहमी वाहतूक कोंडी होणार्या खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणांची कामे अल्प मुदतीत स्वतंत्र निविदा राबवून केल्यास 2 ते 3 महिन्यांत कामे पूर्ण केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली. यासंदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून गडकरी व महामार्ग प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष, सचिव व इतर अधिकार्यांना भेटून पाठपुरावा केला.